ट्रम्प यांचा ब्रिटनच्या पंतप्रधानांना बोचणारा सवाल
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
युक्रेनविषयक अमेरिकेच्या बदललेल्या विदेश धोरणामुळे युरोपीय देशांच्या पायाखालची जमीनच जणू सरकली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या शांतता प्रस्तावाला युक्रेनकडून मान्यता मिळणे अवघड मानले जात आहे. तर दुसरीकडे युरोपीय नेते सातत्याने डोनाल्ड ट्रम्प यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करत आहेत, पण ट्रम्प त्यांच्या विनंतीला जुमानत नसल्याचे चित्र आहे. व्हाइट हाउसमध्ये ब्रिटनचे पंतप्रधना कीर स्टारमर यांनी युक्रेनसाठी सुरक्षा हमी मागितली असता ट्रम्प यांनी ब्रिटन एकटाच रशियाला पराभूत करू शकेल का असा प्रश्न केला. रशियाच्या आक्रमणाचा मुकाबला करण्याच्या ब्रिटनच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ट्रम्प यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानांना लक्ष्य केले.
युक्रेनसाठी अमेरिकेचे सुरक्षा सहकार्य मागण्याच्या ब्रिटनच्या मागणीकडे ट्रम्प यांनी स्पष्टपणे दुर्लक्ष केले आहे. परंतु यादरम्यान कीर स्टारमर यांनी अमेरिकेच्या अध्यक्षांचे मन वळविण्यासाठी त्यांचे कौतुकही केले, युक्रेनमध्ये शांतता डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळेच शक्य झाल्याचे वक्तव्य स्टारमर यांनी केले आहे.
ब्रिटनच्या पंतप्रधानांनी युक्रेनमध्ये युद्धविरामासाठी अमेरिकेच्या मदतीची मागणी केली. तसेच रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांना युक्रेनवर पुन्हा आक्रमण करण्यापासून रोखण्याचा एकच मार्ग म्हणजे अमेरिकेने सुरक्षेची हमी द्यावी अशी भूमिका स्टारमर यांनी मांडली. परंतु ट्रम्प यांनी त्यांची ही मागणी त्वरित फेटाळली आणि कुठल्याही अमेरिकन सैन्य प्रतिबद्धतेच्या मागणीला नाकारले आहे.
युरोपीय देशांनी स्वत:ची सुरक्षा स्वत: करावी असे ट्रम्प हे सातत्याने म्हणत आले आहेत. स्वत:च्या मागील कार्यकाळादरम्यान ट्रम्प यांनी नाटोच्या कमी फंडिंगसाठी युरोपीय देशांना जाहीरपणे फटकारले होते. याचबरोबर युक्रेनच्या सुरक्षेसाठी देखील युरोपीय देशांनी अधिक आर्थिक भार उचलावा असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे.
युक्रेनसंबंधी कुठलाही करार झाला तर तो स्थायी स्वरुपाचा अन् सुरक्षित असावा हे सुनिश्चित करावे लागणार आहे. आम्ही आमची भूमिका पार पाडू असे स्टारमर यांनी ट्रम्प यांच्यासोबतच्या भेटीदरम्यान म्हटले आहे. रशियासोबत करण्यात आलेला शांतता करार कायम राहणार असल्याचे माझे मानणे आहे. पुतीन पुन्हा युक्रेनवर आक्रमण करतील असे मला वाटत नाही. या प्रकरणी आम्ही अत्यंत पुढे गेलो आहोत, परंतु अद्याप आम्ही कुठलाही करार केलेला नाही अशी भूमिका ट्रम्प यांनी यावर पाडली आहे.









