वृत्तसंस्था/ अहमदाबाद
मोहाली येथे पंजाब किंग्सच्या कठीण आव्हानाचा सामना करावा लागलेला गुजरात टायटन्स संघ आज रविवारी इंडियन प्रीमियर लीगमधील सामन्यात राजस्थान रॉयल्सशी लढणार असून त्यावेळी गुणतालिकेत अव्वल स्थानावर जाण्याचे त्यांचे निश्चितच लक्ष्य असेल. इतिहासाचा विचार करता परिस्थिती गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या बाजूने आहे. कारण संघाने आतापर्यंत राजस्थान रॉयल्सविऊद्धचे तिन्ही सामने जिंकले आहेत आणि नरेंद्र मोदी स्टेडियमवर उतरताना संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थानच्या संघाच्या मनात ही बाब नक्कीच घोळणार आहे.
गुजरात टायटन्सने गेल्या वर्षी स्पर्धेत प्रथमच उतरूनही अंतिम सामन्यात सात गडी राखून मिळविलेला विजय कोणी विसरू शकणार नाही. पांड्याच्या संघाने ती लढत एकतर्फी बनवताना 11 चेंडू शिल्लक असताना विजय मिळविला होता. साखळी टप्प्यातील गुजरात टायटन्सचे विजय देखील संघाचा दर्जा आणि बांधिलकी दाखवून देतात. ते सध्या सहा गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहेत. लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांचेही गुण तितकेच आहे. फक्त धाव सरासरीने त्यांच्या फरक घडवून आणलेला आहे.
दोन्ही बाजू फलंदाजी आणि गोलंदाजीच्या आघाड्यांवर समान ताकदीच्या असल्या, तरी मानसिकदृष्ट्या विचार करता गुजरातचे पारडे किंचित भारी ठरू शकते. दुसरीकडे, संजू सॅमसनचा संघ भूतकाळातील निकालांचा फारसा फरक पडत नाही हे सिद्ध करण्यास उत्सुक असेल. यशस्वी जयस्वाल, जोस बटलर आणि संजू सॅमसन यांचा समावेश असलेली राजस्थानची वरची फळी या हंगामात सर्वांत स्फोटक ठरली आहे. त्याची ‘पॉवरप्ले’मधील धावांची सरासरी दहा संघांमध्ये सर्वांत जास्त म्हणजे 66.8 इतकी आहे. बटलरचा ‘पॉवरप्ले’मधील स्ट्राइक रेट 196.6 इतका असून तो फलंदाजांमध्ये सर्वोत्तम आहे त्याने आतापर्यंत त्या महत्त्वपूर्ण सहा षटकांमध्ये चक्क 114 धावा काढलेल्या आहेत. तसेच जयस्वालने ‘पॉवरप्ले’मध्ये 184 इतक्या स्ट्राइक रेटने 92 धावा काढलेल्या असल्याने त्यालाही गुजरातला हलकेपणाने घेता येणार नाही. आज रविवारी राजस्थान रॉयल्सला आणखी एक धडाकेबाज सुऊवात गतविजेत्यांविऊद्ध पहिला विजय नोंदविण्याच्या दृष्टीने मदतकारी ठरू शकते. मधल्या फळीत देवदत्त पडिक्कल, रविचंद्रन अश्विन, शिमरॉन हेटमायर आणि वेस्ट इंडिजचा अष्टपैलू जेसन होल्डर याच्यासारख्या खेळाडूंची उपस्थिती पाहता राजस्थानची फलंदाजीतील ताकद भरपूर मोठी आहे. गोलंदाजीच्या आघाडीवर अॅडम झम्पा, अश्विन आणि यजुवेंद्र चहल असे तीन अव्वल फिरकीपटू त्यांच्याकडे आहेत. गुजरात टायटन्सकडे कर्णधार पांड्या, मधल्या फळीतील विध्वंसक फलंदाज डेव्हिड मिलर, शुभमन गिल, साई सुदर्शन आणि अष्टपैलू विजय शंकर आणि मोहित शर्मा यासारखे नवीन तारे असल्याने त्यांचेही आव्हान दमदार बनलेले आहे.









