काट्रेज नसल्याने मनपातील प्रिंटरचे काम ठप्प, सीईओंकडून प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप
प्रतिनिधी/ बेळगाव
सध्याच्या संगणकीय युगामध्ये सर्वच सरकारी कार्यालयांमध्ये प्रिंटर आणि काट्रेजला अधिक महत्त्व आले आहे. त्याशिवाय काम करणे अवघडच आहे. मात्र महानगरपालिकेकडेच काट्रेज नसल्याने प्रिंट काढणे अवघड झाले आहे. यामुळे सर्वच विभागाचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे. याबाबत आयुक्त, उपायुक्त आणि सीईओ एकमेकांकडे बोट करत आहेत. पण यामुळे सर्वसामान्य जनता आणि मनपातील कर्मचारी चांगलेच अडचणीत येत आहेत.
जन्म-मृत्यू दाखला, कौन्सिल विभागातील प्रति, किंवा इतर कोणत्याही कामाबाबतची प्रिंट काढण्यासाठी काट्रेजची नितांत गरज आहे. मात्र काट्रेजच नसल्यामुळे आता मनपाला काट्रेज देता का हो… असा सूर मनपातील कर्मचारी काढत आहेत. कोणतीही प्रिंट घेण्यासाठी काट्रेजची गरज असते. पण गेल्या काही दिवसापासून सीईओकडून काट्रेज खरेदीसाठी कोणत्याच हालचाली सुरू नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. बऱ्याचवेळा कागदांचा तुटवडा पडतो. तर आता आता काट्रेजचा तुटवडा निर्माण झाला आहे.
महानगरपालिकेमध्ये सावळा गोंधळ
याबाबत सीईओ इराण्णा चंदरगी यांच्याशी संपर्क साधला असता योग्य प्रकारे स्टेशनरी साहित्याची मागणी होत नसल्यामुळे समस्या निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. उपायुक्त उदयकुमार तळवार यांनी मी सही करून फाईल पुढे पाठविली आहे असे सांगत होते. तर मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी माझ्याकडे कोणतीच फाईल प्रलंबित नसल्याचे उत्तर देत होते. एकूणच महानगरपालिकेमध्ये सावळा गोंधळ सुरू असल्याचे दिसून आले.
स्टेशनरी साहित्य मिळणे झाले अवघड
सर्वसामान्य जनता कामासाठी महानगरपालिकेमध्ये येते. मात्र अशा कारणांनी त्यांना ताटकळत थांबावे लागते किंवा बाहेर प्रिंट घ्या म्हणून त्यांना सांगावे लागत आहे. यामुळे येथील कर्मचारी अक्षरश: कंटाळले आहेत. कोणत्याही प्रकारची स्टेशनरी साहित्याची गरज भासल्यास लवकर मिळणे अवघड झाले आहे. यावरून महानगरपालिकेकडे निधी नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या सर्व प्रकारावरून गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचे स्पष्ट होत आहे.









