जगदीश पाटील, गडहिंग्लज
Gram Panchayat Election 2022 : गडहिंग्लज तालुक्यातील 34 पैकी कडलगे, बटकणंगले, कडाल आणि कौलगे या चार गावच्या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.तर हसुरसासगिरी,वैरागवाडी येथील सदस्यपदाच्या निवडी बिनविरोध पार पडल्या.तरी या गावात सरपंच पदाची चुरस राहणार आहे.ऐन थंडीत 30 गावात प्रचाराचा धुरळा उडणार असून याला आगामी जिल्हा परिषद,पंचायत समितीची चाहूल असणार आहे.
गडहिंग्लज तालुक्यातील 30 गावच्या निवडणुका लागल्या आहेत.यामध्ये प्रामुख्याने भडगाव,महागाव,नेसरी,बडय़ाचीवाडी,कडगाव,हिटणी,करंबळी या मोठया गावांचा समावेश असल्याने अधिक लक्ष नेतेमंडळीची या निवडणुकीकडे लागली आहे.स्थानिक पातळीवर झालेल्या यशस्वी तडजोडीनंतर कडलगे,बटकणंगले, कडाल आणि कौलगे या ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात नेतेमंडळींना यश आले आहे.बहुतांशी ठिकाणी दुरंगी लढतीचे चित्र समोर येत असले तरी अप्पी पाटील पताडे गट या पारंपारिक गटाशिवाय रिंगणात आल्याने महागावात वेगळी चुरस दिसणार आहे.हिटणीत पारंपारिक लढत होत असून नेसरीत मात्र सत्तेत असणाऱ्या भाजपा-राष्ट्रवादी आघाडीला रोखण्यासाठी विरोधकांनी शिंदे-नेसरीकर यांच्या पुढाकाऱ्याने पॅनेलची रचना केली आहे.येथेही चुरस दिसणार आहे.कडगावात सत्तेत असणाऱ्या भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादीला एकी करण्यात अपयश आले असून एक गट विरोधात रिंगणात आला आहे.करंबळीत राष्ट्रवादी विरुद्ध अन्य गट अशी आघाडी लढताना दिसणार आहे.
भडगावात राष्ट्रवादीला रोखण्यासाठी समविचारी आघाडीच्या माध्यमातून आघाडी करत निवडणुकीला रंग भरला आहे.तर येथे भाजपाने ही सरपंच पदासह काही जागा लढवत रिंगणात येणे पसंत केले आहे.बड्याचीवाडीला राष्ट्रवादी,भाजपा,जनता दल असे प्रमुख पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना पुढे करत पॅनेलची रचना केल्याचे पहावयास मिळते आहे.मुगळीत पाटील-शिरकोळे गटाने आघाडी केली असून त्याच्या विरोधात आरबोळे गटाने काहींना घेऊन सरळ लढतीत आव्हान उभे केले आहे.बेकनाळ,कुंबळहाळ येथे दुरंगी लढत होताना दिसते आहे.हसुरवाडीत,येणेचंवडीत तिरंगी लढतीचे चित्र समोर येते आहे.
शिप्पूर तर्फे नेसरी (3),सांबरे,हडगले,डोणेवाडी (प्रत्येकी 2),खमलेहट्टी,हिडदुगी,सरोळी,तारेवाडी,बेकनाळ (प्रत्येकी 1)अशा 29 ग्रामपंचायतीच्या सदस्यांची जागा बिनविरोधी झाल्या आहेत.उर्वरित गावातून प्रचारांचा धुरळा उडणार असून नुकताच पार पडलेल्या गडहिंग्लज कारखान्याच्या निवडणुकीचा परिणाम जाणवू लागला आहे.भडगाव येथे हे चित्र प्रकर्षाने दिसते आहे.आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या मातब्बरांनी प्रत्येक गावात लक्ष ठेवत अधिकाधिक आपल्या गटाचे सदस्य निवडून येण्यासाठी आत्तापासून प्रयत्न सुरू केले आहेत.गावावर सत्ता मिळविण्यासाठी 30गावातील राजकारण चांगलेच तापल्याचे दिसते आहे.
वैरागवाडी, हसुरसासगिरी सरपंचाची निवडणूक
तालुक्यातील वैरागवाडी आणि हसुरसासगिरी या दोन गावात विचित्र परिस्थिती पहायला मिळाली आहे. वैरागवाडीतील ग्रामपंचायतीच्या सर्व 7 आणि हसुरसासगिरी ग्रामपंचायतीच्या सर्व 7 सदस्यांच्या निवडी बिनविरोधी झाल्या आहेत. केवळ सरपंचपदासाठी निवडणूक रंगणार आहे. वैरागवाडी, हसुरसासगिरी या दोन्ही गावचे सरपंचपद खुले असल्यामुळे माघारीत एकमत न झाल्याने केवळ सरपंच पदासाठी चुरस रंगणार आहे.
तीच आश्वासने
गेल्या 15-20 वर्षापासून होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत प्राधान्याने पाणीपुरवठा,स्वच्छता,गटार आणि वीज याचीच आश्वासने दिली जातात.यावेळी ही त्याला कोठेच छेद मिळाल्याचे दिसत नाही.प्रत्येक ग्रामपंचायतीत रिंगणात आलेल्या आघाडीने गावातील रस्ते करणार,सुरळीत पाणीपुरवठा करणार,गटार बांधणार हीच पारंपारिक आश्वासने दिली जाणार आहेत.गेले 15-20 वर्षाने हीच आश्वासने ऐकणाऱ्या ग्रामस्थांनी यापूर्वीच्या मंडळींनी दिलेली आश्वासने का पाळली नाहीत ? असा प्रश्न विचारला जातो आहे.
Previous Article‘मॅन्दोस’ आज रात्री महाबलीपूरमजवळ धडकणार
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.