फेरीवाल्यांच्या हातगाड्या कोतवाल गल्लीत स्थलांतर
प्रतिनिधी/ बेळगाव
शहरातील विविध रस्त्यांवर दुतर्फा फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. तसेच व्यावसायिकांनी दुकानांसमोर पत्रे घातले असून जाहिरात फलक ठेवले आहेत. परिणामी वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. खडेबाजारमधील अतिक्रमणामुळे रहदारी पोलिसांची डोकेदुखी वाढल्याने महापालिकेच्या मदतीने बुधवारी अतिक्रमणे हटविण्यात आली. तसेच फेरीवाल्यांच्या हातगाड्या कोतवाल गल्लीत स्थलांतर करण्यात आल्या.
खडेबाजार रस्त्यावर दुतर्फा फेरीवाल्यांनी अतिक्रमण करून ठाण मांडले आहे. परिणामी रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. रस्त्यावर विविध व्यवसाय थाटण्यात आले असून या मार्गावरून वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. तसेच मध्यवर्ती बसस्थानकाकडे ये-जा करणाऱ्या नागरिकांची गर्दीही असते. सूचना करूनही फेरीवाले रस्त्यावरील अतिक्रमण हटवित नाहीत. तसेच व्यावसायिकांनी गटारीवर जम्प घातले आहेत. रस्त्याच्या काठावर विविध प्रकारचे जाहिरात फलक ठेवल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. फेरीवाले आणि व्यावसायिकांच्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याने रहदारी पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे गटारीवर असलेले जम्प्स् आणि जाहिरात फलक हटविण्याची कारवाई महापालिकेच्यावतीने करण्यात आली.









