एकाच दिवसात सहा जनावरे, नऊ कुत्री पकडण्यात यश
बेळगाव : महापालिकेच्या पशू संगोपन विभागाकडून शहरातील भटकी कुत्री आणि मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. गुरुवारी विविध ठिकाणी सहा जनावरे आणि नऊ कुत्री पकडण्यात आली आहेत. जनावरांची रवानगी श्रीनगर येथील गोशाळेत तर कुत्र्यांची रवानगी एबीसी सेंटरमध्ये करण्यात आली आहे. शहर आणि उपनगरात भटकी कुत्री आणि मोकाट जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे याचा फटका बेळगावकरांना सहन करावा लागत आहे. मोकाट जनावरे रस्त्यावरच ठाण मांडून बसत असल्याने याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर होत आहे. विविध ठिकाणी वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. जनावर मालकांना अनेकवेळा सूचना करूनदेखील त्यांच्याकडून शहरात जनावरे सोडली जात आहेत.
त्यामुळे आता मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम मनपाच्या पशू संगोपन खात्याकडून तीव्र करण्यात आली आहे. तसेच भटक्या कुत्र्यांचाही उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात येत नसल्याने नागरिकांतून तक्रारी वाढल्या आहेत. कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे विविध ठिकाणी पकडण्यात येणारी कुत्री श्रीनगर येथील एबीसी सेंटरमध्ये नेऊन त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जात आहे. गुरुवारी मनपाच्या पशू संगोपन विभागाचे वरिष्ठ पशू निरीक्षक राजू संकण्णावर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात एकूण सहा मोकाट जनावरे आणि नऊ भटकी कुत्री पकडण्यात आली. सदर मोहीम कायमस्वरूपी सुरू ठेवण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.









