प्रति महिना दहा लाखाचे उद्दिष्ट : एकूण 1 कोटी 60 लाखांचा कर थकीत : अनुदान रोखण्याचा इशारा
खानापूर : खानापूर नगरपंचायतीच्या थकीत करवसुलीसाठी अधिकाऱ्यांकडून जागृती मोहीम हाती घेण्यात आली असून करवसुली मोहीम तीव्र करण्यात आली आहे. नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सर्वच खात्याचे कर्मचारी करवसुलीसाठी प्रयत्न करत आहेत. दर महिना दहा लाखाचे उद्दिष्ट असून एकूण 1 कोटी 60 लाखाचा कर थकलेला आहे. त्यामुळे नगरपंचायत खात्याकडून विकासनिधी रोखण्याचा इशारा नगरपंचायत मंत्रालयातून देण्यात आला आहे. त्यामुळे शंभर टक्के करवसुली करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे मुख्याधिकारी संतोष कुरबेट यांनी सांगितले.
शहरातील स्थावर मालमत्ता, पाणी पट्टी, दुकान गाळ्यांचे भाडे, परवाना शुल्क असा अंदाजे 1 कोटी 60 लाखाचा कर थकलेला आहे. नुकतीच राज्य नगरविकास मंत्र्यांच्या सूचनेनुसार नगरपंचायतीने करवसुलीची मोहीम राबवण्यास सुरवात केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून तसेच पंधराव्या वित्त आयोगामार्फत नगरपंचायतींना विकास निधी देण्यात येतो. मात्र नगरविकास मंत्री सुरेश यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत जर पंचायतीनी शंभर टक्के करवसुली केली नसल्यास विकास निधी देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केल्याने मुख्याधिकाऱ्यांनी करवसुली मोहीम तीव्र केली आहे.
मुख्याधिकारी संतोष कुरबेट, महसूल विभागाचे अधिकारी गंगाधर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली वसुली पथके तयार केली असून अधिकारी स्वत: कर्मचाऱ्यांसोबत करवसुलीसाठी प्रयत्न करत आहेत. प्रति महिना दहा लाखांचे करवसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्या दृष्टेने प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. शहरातील नागरिकांनी करवसुलीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन नगर पंचायतीच्यावतीने करण्यात आले आहे.
मालमत्ताधारकांनी सहकार्य करावे
गेल्या तीन-चारवर्षापासून थकीत असणाऱ्या कर दात्यानी येत्या महिन्याभरात आपला थकीत कर भरावा, अन्यथा कायदेशीर क्रम घेण्यात येणार असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. शहरात मुख्याधिकारी आणि कर्मचारी करवसुलीसाठी सकाळच्या सत्रात प्रत्यक्ष भेटी घेऊन करवसुलीसाठी प्रयत्न करत आहेत. याला शहरातील मालमत्ता धारकांनी प्रतिसाद देत असून करवसुलीचे उद्दिष्ट गाठल्यास निश्चित विकास निधी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी मालमत्ता धारकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगरपंचायतीकडून करण्यात आले आहे.









