मतदान उद्या : भाजप आणि काँगेसमध्ये चुरस

सिमला / वृत्तसंस्था
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठीचा जाहीर प्रचार गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता संपला आहे. या छोटय़ा राज्यात उद्या शनिवारी मतदान होत आहे. या मतदानाची जय्यत तयारी केंद्रीय निवडणूक आयोगाने पूर्ण केली असून मतदान शांततेत पार पडावे यासाठी सुरक्षा व्यवस्थाही चोख ठेवण्यात येणार आहे.

हिमाचल प्रदेशात विधानसभेच्या 68 जागा असून एकंदर 413 उमेदवार स्पर्धेत आहेत. निवडणूक आयोगाने 7,881 मतदान केंद्रांची व्यवस्था केली आहे. एकंदर 55 लाख 7 हजार 261 मतदार असून प्रथम मतदान करणाऱयांची संख्या 69,781 इतकी आहे. मतदारांमध्ये 27,80,208 पुरुष आणि 27,27,016 महिला मतदार आहेत. युवा मतदारांची टक्केवारी 75 टक्के इतकी आहे. दिव्यांग मतदारांची संख्या 56,001 इतकी असून त्यांच्या संख्येत 1,470 ची वाढ आहे.

महिलांचे प्रमाण वाढले
या राज्यातील मतदारांमध्ये पुरुषांच्या प्रमाणात महिलांचा अनुपात वाढला आहे. मागच्या निवडणुकीत प्रतिहजार पुरुष मतदारांमागे 978 महिला मतदार होत्या. आता ही संख्या वाढून 981 झाली आहे. निवडणूक आयोगाने मतदार सूचींना अंतिम रुप दिले असून त्यांना प्रसिद्धीही दिली आहे. सर्व मतदारकेंद्रांवर अधिकारी पाठविण्यास प्रारंभ करण्यात आला असून अधिकाऱयांना सुरक्षा आणि सोय देण्यात आली आहे. आयोगाच्या वतीने ही माहिती देण्यात आली.

सुलह सर्वात मोठा मतदारसंघ
कांगडा जिल्हय़ातील सुलह हा मतदारसंघ सर्वात मोठा असून तेथे 1 लाख 4 हजार 486 मतदार आहेत. तर लाहौल-स्फिती मतदारसंघात सर्वात कमी, अर्थात 24 हजार 744 मतदार आहेत. संपूर्ण मतदार सूची इंटरनेटवर उपलब्ध असून मतदान केंद्रांचीही माहिती मतदारांच्या सोयीसाठी देण्यात आली आहे.
सुरक्षेसाठी सैन्यदले
मतदान शांततेत पार पडावे म्हणून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून एनडीआरएफ आणि एसडीआरएफ दले नियुक्त करण्यात आली आहेत. नैसर्गिक आपत्तींचे निवारण करता यावे यासाठी या दलांचे 50 रक्षक लाहौल-स्फितीमध्ये नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच चंबा आणि पांगी येथेही आपत्तीनिवारण कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी मनीष गर्ग यांनी दिली. प्रत्येक मतदान केंद्रावर पुरेसे सुरक्षा सैनिक नियुक्त आहेत.









