आठ गाळे घेतले ताब्यात : भाडेकरूंना दिला ताबा, बेकायदेशीर कब्जा घेतलेल्या गाळेधारकांना दणका
बेळगाव : महात्मा फुले भाजी मार्केटमधील काही गाळ्यांवर बेकायदेशीररित्या काही जणांनी कब्जा घेतला होता. महानगरपालिकेच्या पथकाने अचानक शुक्रवारी त्याठिकाणी जाऊन आठ गाळे ताब्यात घेतले. त्यानंतर ते गाळे ज्यांनी लिलावामध्ये भाग घेऊन घेतले होते. त्यांच्याकडे हे गाळे सुपूर्द करण्यात आले. महानगरपालिकेच्या या अचानक मोहिमेमुळे बेकायदेशीर कब्जा घेतलेल्या गाळेधारकांना चांगलाच दणका बसला आहे.
महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये गेल्या काही वर्षांपासून ते बेकायदेशीररित्या गाळ्यांमध्ये व्यवसाय करत होते. काही जण न्यायालयाचा आधार घेत होते. तर काही जण दबाव घालून त्या गाळ्यांचा वापर करत होते. महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेने अनेकेवेळा त्याठिकाणी धाड टाकून गाळे ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र काही तरी कारण सांगून ते गाळे देण्यास टाळाटाळ सुरू केली होती. त्यामुळे शुक्रवारी मनपाच्या अतिक्रमण हटाव मोहीम पथकाने त्याठिकाणी अचानकपणे जाऊन हे गाळे ताब्यात घेतले आहेत.
रविंद्र भद्रकाळी यांच्यासह इतर काही जणांनी हे गाळे लिलावामध्ये घेतले आहेत. त्या सर्वांना हे गाळे देण्यात आले. मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल अधिकारी संतोष आनिशेट्टर, महसूल विभागाचे व्यवस्थापक फारुख यड्रावी, मार्केट विभागाचे निरीक्षक नंदू बांदिवडेकर, मलिक गुंडप्पनवर, सुरेश अलूर, सुशांत कांबळे, वैजू कदम यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी या मोहिमेमध्ये भाग घेतला होता.
पोलीस संरक्षण न घेताच कारवाई
शुक्रवारी अचानक ही कारवाई केली आहे. कारवाई करताना गुप्तता ठेवण्यात आली होती. पोलीस संरक्षणही घेण्यात आले नाही. महानगरपालिकेचे अतिक्रमण हटाव मोहीम पथक त्याठिकाणी दाखल झाले. त्यानंतर 8 गाळ्यांचा कब्जा घेऊन भाडेकरूंना त्याचा ताबा देण्यात आला आहे.









