सिंचन क्षमता टिकवून ठेवण्यासाठी मोहिम राबविण्याच्या सर्व गटविकास अधिकाऱ्यांना सूचना; मदान व सीएसआर निधीतून बंधारे बांधण्याचे आवाहन
कोल्हापूर प्रतिनिधी
नैसर्गिक साधन संपत्तीची क्षमता वृध्दींगत करण्यासाठी विविध जलस्त्राsतांची (कोल्हापूरी बंधारे, सिमेंट बंधारे, साठवण बंधारे, लघु पाटबंधारे, योजना, पाझर तलाव, गाव तलाव आदी) सिंचन क्षमता टिकवून ठेवणे गरजेचे आहे. पावसाळी हंगाम संपल्यानंतर ऑक्टोंबरनंतर काही कालावधीपर्यंत जे नाले व ओढयामधून पाण्याचा प्रवाह चालू असतो. तेथे पाण्याचा प्रवाह पारंपारिक पध्दतीने आडवून पाण्याचा साठा करणे आवश्यक आहे. हा साठा बिगर पावसाळी हंगामातील पाण्याची गरज काही प्रमाणात भागविण्यासाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जिह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये श्रमदान आणि सीएसआर निधीतून वनराई बंधारे बांधण्याची मोहिम राबवावी असे आदेश सीईओ तथा प्रशासक संतोष पाटील यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.
सीईओ चव्हाण यांनी गटविकास अधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात मोहिम राबविण्याबाबत विविध सूचना दिल्या आहे. पत्रात म्हटले आहे, सिमेंटची रिकामी पोती, माती, वाळू आदींचा वापर करुन वनराई बंधारे बांधण्याची आवश्यकता आहे
त्यासाठी योग्य जागांची निवड करून साखळी पध्दतीने बंधारे बांधावेत. जेणेकरुन ओढे नाल्यातील वाहत्या पाण्याचा वेग कमी करुन पाणी साठा तयार करता येईल. तसेच वाहून जाणारे पाणी जमिनीमध्ये जिरवता येईल. यासाठी वनराई बंधारे बांधकामाचे ग्रामपंचायत निहाय उदिदष्ट द्यावे.
कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठवणूक होण्यासाठी विहीत कालावधीमध्ये धडक कार्यक्रम राबवून लोकसहभागातून व लोकचळवळीच्या माध्यमांतून ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग घ्यावा. महिला बचत गट, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, अशासकिय संस्था, महाविद्यालयातील विद्यार्थी आदींचा सहभाग घ्यावा. या मोहिमेमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधीना सहभागी करुन घ्यावे.
त्याबाबत तालुका स्तरावरून ग्रामपंचायतीला मार्गदर्शन करण्यासाठी कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी (कृषी) यांची गाव निहाय नियुक्ती करावी. माझी वसुंधरा अभियान-4 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व गावामध्ये वनराई बंधारे बांधण्याची कामे प्राधान्याने घेण्याबाबत सीईओ पाटील यांनी गटविकास अधिकाऱ्यांना सूचित केले.
वनराई बंधारे बांधण्यासाठी वेळापत्रक तयार करा
वनराई बंधारे बांधण्यापूर्वी, तसेच बांधकाम पूर्ण झाल्यानंतरचे जिओ टॅग फोटो काढावेत. बंधारे बांधण्यासाठी 17 ऑक्टोंबर ते 30 नोव्हेंबर 2023 या कालावधीत ग्रामपंचायत निहाय वेळापत्रक तयार करावे. त्यानुसार केलेल्या कार्यवाहीचा अहवाल 15 डिसेंबर पूर्वी सादर करावा असे सीईओ पाटील यांनी आवाहन केले आहे.