शहर परिसरात सात जणांना अटक : पोलिसांकडून आठ दिवसांपासून छापेमारी सुरूच
बेळगाव : मटका, जुगार, अमलीपदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध बेळगाव पोलिसांनी मोहीम तीव्र केली आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या आठ दिवसांपासून गैरधंद्यांवर छापेमारी करण्यात येत आहे. शनिवारी सीईएन व टिळकवाडी पोलिसांनी गांजा विकणाऱ्या सहा जणांना अटक केली आहे. मटका, जुगाराबरोबरच तरुणाईला व्यसनाधीन बनवणाऱ्या अमलीपदार्थ विक्रेत्यांविरुद्धही कारवाई करण्याची सूचना पोलीस आयुक्तांनी केली आहे. खास करून शिक्षण संस्थांजवळ गांजा, पन्नी पुरवणाऱ्या विक्रेत्यांचा शोध घेऊन त्यांच्या मुसक्या आवळण्यात येत आहेत. शनिवारी शहर सीईएन पोलिसांनी कॅम्प येथील शौर्य चौकजवळ दोघा जणांना अटक केली आहे. सीईएनचे पोलीस उपअधीक्षक जे. रघू व त्यांच्या सहकाऱ्यांनी किरण गुंडू आडवे (वय 21) राहणार नवी गल्ली, आंबेवाडी याला अटक करून त्याच्याजवळून सुमारे 2 हजार रुपये किमतीचा 200 ग्रॅम गांजा जप्त केला आहे.
किरणने शिनोळी येथील राहुल या आपल्या साथीदाराच्या नावाचीही वाच्यता केली असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. किरणला पोलीस कोठडीत घेऊन त्याची चौकशी करण्यात येणार आहे. टिळकवाडी पोलिसांनी पाच जणांना अटक करून सुमारे 25 हजार 180 रुपये किमतीचा 494 ग्रॅम गांजा, विक्रीसाठी वापरण्यात आलेली एक कार जप्त केली आहे. टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक परशुराम पुजारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी गोडसेवाडीजवळ ही कारवाई केली असून खास करून विद्यार्थ्यांना गांजा पुरविण्याचे काम केले जात होते. विनायक प्रकाश कोल्हापुरे (वय 29), संदेश शीतल गवाली (वय 24), कुमार गोविंद पुजेरी, रोहित शंकर मुळवे, सौरभ श्रीधर सातुस्कर सर्व राहणार भवानीनगर अशी त्यांची नावे आहेत. या सर्व पाच जणांविरुद्ध अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यांनी गांजा कोठून आणला? याची चौकशी करण्यात येत आहे.









