वार्ताहर/उचगाव
बेनकनहळ्ळी येथील श्री ब्रम्हलिंग भात शेतकरी संघ यांच्या विद्यमाने शेतकऱ्यांसाठी शेती पीक आणि भाताचे अधिक उत्पादन कसे काढावे, यावरती कृषी खात्यामार्फत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये सेंद्रिय खतांचा वापर अधिकाधिक करून शेती कशी करावी, भातपीक आणि इतर पिके कशी भरघोस काढावीत, याबाबत या शिबिरामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी ज्योतिबा पिसाळे होते.
या शिबिरामध्ये कृषी खात्याचे अधिकारी एम. एस. पटगुंदी, राजशेखर भट, प्रभू डोणी, मल्लेश नाईक, नवहिंद पाटील, राणू पाटील या कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी या शिबिरामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतीमध्ये येणारी विविध पिके, त्यावरती होणारा औषधोपचार, सेंद्रिय खते, भाताच्या नवीन जाती अशा विविध विषयांवर प्रत्येकाने आपापली माहिती यावेळी शेतकऱ्यांना दिली.
या शिबिरामध्ये कृषी खात्याकडून मिळालेल्या अनमोल अशा शेती विषयक माहितीबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. आणि अशीच शिबिरे गावामध्ये भरवून शेतीविषयक सहा महिन्यातून एकदा येणाऱ्या विविध पिकाबद्दल माहिती द्यावी, अशीही यावेळी मागणी करण्यात आली. उपस्थितांचे स्वागत मदन पाटील यांनी तर आभार बाळू पाटील यांनी मानले.









