वार्ताहर /कणकुंबी
अठरा वर्षाखालील मुलामुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडू नये म्हणून पोक्सो कायदा काढण्यात आलेला आहे. पोलीस खाते आणि शिक्षण खात्यामार्फत शाळा महाविद्यालयांमध्ये पोक्सो कायद्याविषयी जनजागृती करण्यात येत आहे, अशी माहिती जांबोटी ओपीचे खानापूर पोलीस स्थानकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक के. आय. बडिगेर यांनी दिली. जांबोटी येथील बाबुराव ठाकुर महाविद्यालयात पोक्सो कायद्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजच्या प्राचार्या पुजा पाटकर होत्या. प्रारंभी एएसआय के. आय. बडिगेर, कणकुंबी हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. जी. चिगुळकर व प्राचार्या पुजा पाटकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी एस. जी. चिगुळकर यांनी पोक्सो कायद्याविषयी माहिती देताना सांगितले की, आजकाल समाजामध्ये अल्पवयीन मुलामुलींच्या बाबतीत लैंगिक शोषणाच्या घटना घडत आहेत. विशेषत: मुलींना या पोक्सो कायद्यामुळे फार मोठा आधार निर्माण झाला आहे. शारिरिक अत्याचार, लैंगिक शोषण, धक्काबुक्की, सोशल मीडियावरून अश्लील व्हिडिओ किंवा मेसेज पाठवणे, अश्लील इशारे करणे, अश्लील टोमणे मारणे इत्यादी अनेक बाबतीत पोक्सो कायद्यांतर्गत कारवाई करण्याची तरतूद आहे. 18 वर्षांच्या आतील मुलामुलींवर लैंगिक अत्याचार झाल्यास पोक्सो कायद्यामुळे संरक्षण मिळू शकते. यावेळी प्राचार्या पुजा पाटकर यांनी पोक्सो कायद्याविषयी विद्यार्थ्यांनी जागरूक राहिले पाहिजे. यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक कृष्णा पाटील यांनी प्रास्ताविक भाषणात सांगितले की, देशातील आणि जगभरातील वाढत्या लैंगिक अत्याचारामुळे पोक्सो कायदा 2012 पासून अंमलात आणला गेला. अशा घटनांना निर्बंध घालण्यासाठीच हा कायदा काढण्यात आल्याचे सांगितले. याप्रसंगी कॉलेजचे प्राध्यापक निलेश धामणेकर, पांडुरंग गुरव, चांगाप्पा पाटील, सौरभा उंदारे व अस्मिता देसाई उपस्थित होते.









