शोधमोहीम सुरूच : वनखात्याला अपयश, शहरवासीय चिंतेत
बेळगाव : अनगोळ येथील एसकेई सोसायटीच्या प्लॅटिनम मैदानात मागील चार दिवसांपासून बिबट्यासदृश प्राण्याच्या पायाचे ठसे उमटू लागले आहेत. मात्र, या अज्ञात प्राण्याचा शोध घेण्यात वनखात्याला अपयश आले आहे. दरम्यान, शनिवारी रात्री एका बालकाला बिबट्यासदृश प्राणी नजरेला पडला. त्यामुळे रविवारी पुन्हा वनखात्याने दाखल होऊन शोधमोहीम हाती घेतली. मात्र, अद्याप या अज्ञात प्राण्याचा शोध लागला नाही. त्यामुळे शहरवासीयदेखील चिंतेत आहेत. शिवाय हा अज्ञात प्राणी त्या परिसरातच आहे की निघून गेला? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. भरवस्तीत वन्यप्राण्याच्या पायाचे ठसे दिसून आल्याने शहरात याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. वनखात्याने शोधमोहीम हाती घेतली असली तरी अद्याप शोध लागलेला नाही. दरम्यान, रविवारी परिसरातील झाडांच्या बुध्यांवर ट्रॅप कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या ट्रॅप कॅमेऱ्यात अज्ञात प्राण्याची छबी कैद झाल्यास कोणता प्राणी आहे, हे स्पष्ट होणार आहे.
अलीकडे शहरात सातत्याने वन्यप्राण्यांचा वावर वाढू लागला आहे. त्यामुळे या वन्यप्राण्यांना रोखण्याचे आव्हानदेखील वनखात्यासमोर उभे ठाकले आहे. वन्यप्राणी अन्न, पाणी आणि भक्ष्याच्या शोधात सैरभैर होऊ लागले आहेत. दरम्यान, जंगल वाट सोडून शहरात एंट्री करू लागले आहेत. त्यामुळे शहरवासीय आणि वनखात्याचीदेखील झोप उडाली आहे. रविवारी वनखाते आणि पोलीस खात्याने अनगोळ, सह्याद्री कॉलनी परिसर पिंजून काढला. मात्र, वन्यप्राण्याविषयी कोणताच पुरावा हाती लागला नाही. वनखाते विष्ठा आणि इतर काही मिळते का? याबाबत शोध घेऊ लागले आहे. मात्र खात्याला अज्ञात प्राण्याच्या पायांच्या ठशांव्यतिरिक्त इतर कोणताच पुरावा हाती लागला नाही. त्यामुळे शहरवासियांची धाकधूक वाढली आहे. शिवाय ठसे मिळालेला प्राणी अद्याप त्या ठिकाणीच आहे की तेथून निघून गेला आहे? याबाबतही आता चर्चा सुरू झाली आहे.
अज्ञात प्राण्याविषयी अद्याप कोणताच पुरावा नाही : विनय गौडर (वनक्षेत्रपाल)
रविवारी सकाळी पोलिसांच्या सहकार्याने सह्याद्री कॉलनीत शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र, अज्ञात प्राण्याविषयी कोणताच पुरावा मिळाला नाही. या परिसरात ट्रॅप कॅमेरे बसविले जाणार आहेत. केवळ पायाचे ठसे दिसून येत आहेत. मात्र, संबंधित प्राण्याची इतर कोणतीच बाब निदर्शनास येत नाही.









