इतरांचा थरकाम उडविणारी अचाट साहसे करण्याचा छंद काही लोकांना जडलेला असतो, हे आपल्याला माहीत आहे. अनेकजण आपल्या साहसी कृत्यांचा व्हिडीओ करुन तो प्रसारित करतात आणि लोकांनाही अशा साहसांचे दर्शन घडवितात. अमेरिकेतल्या एका अशाच धाडसी माहिलेने जे कृत्य केले आहे, त्याला मात्र, तोड सापडणार नाही, अशी अनेकांची प्रतिक्रिया आहे. या महिलेने एक संपूर्ण तलवार गिळली आहे आणि तशास अद्भूत पद्धतीने या साऱ्या प्रसंगाचे व्हिडीओ चित्रणही केले आहे. तलवार गिळण्याच्या प्रकाराइतकीच लोकप्रियता या व्हिडीओचित्रण करण्याच्या पद्धतीलाही मिळताना सध्या सोशल मिडियावर दिसते.
या महेलेचे नाव जिन मिन्स्की असे असून ‘तलवार गिळणे’ हा तिचा व्यवसाय आहे. तिने या व्यवसायाची नोंदही सरकारदरबारी केली आहे. नुकताच या महिलेने एक धरारक व्हिडीओ प्रसारित केला असून त्यात ती 18 इंच लांबीचे एक तलवारीचे पाते पूर्णपणे गिळताना दिसून येते. आपण तलवार कशी गिळतो, हे लोकांना नीटपणे पाहता यावे, यासाठी तिने हा व्हिडीओ करताना तिच्या नाकात एक छोटा कॅमेरा बसविला आहे. ही तलवार या महिलेल्या गळ्यातून आता गेलेली असून हे दृश्य या कॅमेऱ्यातून स्पष्टपणे दिसून येते. या महिलेने हा व्हिडीओ अमेरिकेतील मिडटाऊन वेस्ट येथील कोलंबिया विद्यापीठात बनविला आहे.
हा व्हिडीओ इतका भीतीदायक आहे, की अनेकांनी तो पाहताना आपले डोळे बंद करुन घेतले. नाकात कॅमेरा बसविल्यामुळे तोंडातून तलवार या महिलेल्या घशात कशा प्रकारे जात आहे. हे सर्वांना स्पष्टपणे दिसून येते. धारदार तलवार एखादा खाण्याचा पदार्थ घशाखाली जावा, अशा सहजपणे घशातून खाली जाताना पाहून आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय रहात नाही. हा बनावट व्हिडिओ असेल, अशी शंका येण्यासही जागा आहे. तथापि, तो खरा असून या महिलेने हा प्रकार खरोखरच केला आहे, हे या महिलेने आजवर मिळविलेल्या प्रसिद्धीवरुन कळते. तसेच तो सार्वजनिक स्थानी अनेक लोकांसमोर बनविल्याने शंकेला स्थान उरत नाही. हे प्रयोग करताना कित्येकदा जीवावर बेतण्याचीही शक्यता असते. तथापि, अशा प्रवृत्तीच्या लोकांना ते केल्याशिवाय स्वस्थ बसवत नाही, हेच खरे.









