कोल्हापूर / आशिष आडिवरेकर :
लग्न, जावळ, साखरपुडा अशा समारंभामध्ये तो पाहुणा बनून आला. डोक्यावर फेटा बांधत पाहुणचारही घेतला अन् पाहुणा असल्याचा विश्वास संपादन करत लगीनघाईसह अन्य कार्यक्रमात सोन्याचे दागिने, प्रेझेंट पाकीटवर हात साफ करुन निघून गेला. वीस दिवसांमध्ये 5 घटना घडल्या असून इस्पुर्ली, करवीर, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी पोलीस ठाण्यात संबंधितांनी या अनोळखी पाहुण्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
जानेवारी फेब्रुवारीनंतर लग्नाचे आणि समारंभाचे मुहुर्त सुरु होतात. लग्नसराईसह समारंभ सध्या मोठ्या धुमधडाक्यात करण्याकडे लोकांचा कल आहे. मात्र याच समारंभाच्या आनंदावर विरझण घालण्याचे काम सध्या एक चोरटा करत आहे. गेल्या 20 दिवसांत शहर आणि परिसरातील विविध मंगल कार्यालयात चोऱ्या करुन एक चोरटा धुमाकूळ घालत आहे. अवघ्या 20 दिवसांमध्ये 5 कार्यक्रमात सहभागी होऊन त्याने 10 तोळे दागिन्यांवर हातसफाई केली आहे. समारंभात येणे तेथील नागरीकांशी संवाद साधणे, बोलण्यात गुंतवणे, पाहूणचार घेणे, जेवणावर ताव मारणे आणि जाताना हातसफाई करुन जाणे अशी त्याची चोरीची पद्धत आहे. या चोरट्याने पोलीस यंत्रणेसमोर आवाहन उभे केले असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
या चोरट्याने अत्यंत शिताफीने चोरी केल्याचे समोर आले आहे. समारंभामध्ये सहभागी होत असताना आपण पै पाहुण्यांपैकीच असल्याचे तो वावरत होता. चांगल्या दर्जाचे कपडे परिधान करुन तो समारंभामध्ये सहभागी होत होता. यामुळे त्याचा कोणालाही संशय येत नसे. समारंभामध्ये सहभागी झाल्यानंतर नातेवाईकांकडून फेटा बांधून घेणे, टोपी नारळाचा आहेर स्वीकारणे असे प्रकार करत असल्यामुळे हा तरुण आपल्यातीलच असल्याचे नातेवाईकांना वाटत होते. याचाच फायदा घेऊन अनेक ठिकाणी त्याने हातसफाई केल्याचे समोर आले आहे.
- लागोपाठ घटनांमुळे पोलीसही चक्रावले
लग्नसमारंभामध्ये पाठोपाठ घडलेल्या घटनांमुळे पोलीस दलही चक्रावून गेले आहे. या पाचही ठिकाणी घडलेल्या घटनांच्या नोदी एकत्रित करण्याचे काम स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाकडून सुरु असून, समारंभातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या भामट्याचा शोध सुरु आहे. या पाचही ठिकाणचे सीसीटीव्ही, व्हिडीओ चित्रीकरण एकत्रित करुन ते तपासण्याचे काम सुरु आहे.
- नागरिकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे
लग्नसमारंभ आणि इतर समारंभामध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या महिन्याभरात अशा 4 ते 5 घटना घडल्या असून, नातेवाईकांनी आणि नागरिकांनी याबाबत सावधानता बाळगणे गरजेचे आहे. समारंभातील मौल्यवान वस्तू, पाकिटे अनोळखी व्यक्तीच्या हाती देऊ नयेत. आपल्या विश्वासातील नातेवाईकांकडेच याची जबाबदारी सोपवण्यात यावी.
– पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर
- महिन्याभरात घडलेल्या चोरीच्या घटना
लक्ष्मीपुरी : 23 मार्च जावळ समारंभ : अडीच तोळे
करवीर : 29 मार्च बारसे : दोन तोळे
करवीर : 6 एप्रिल लग्न समारंभ : तीन तोळे
शाहूपुरी : 8 एप्रिल : दोन हजार रुपये
इस्पुर्ली : 9 एप्रिल लग्न समारंभ : चार तोळे








