बिजगर्णी येथील दुर्मिळ प्रकार, दररोज दोन लिटर दूध, चर्चेला उधाण
बेळगाव : गाभण अन् वासराला जन्म न देताच दररोज दोन लिटर दूध देत असल्याचा दुर्मिळ प्रकार बिजगर्णी (ता. बेळगाव) गावामध्ये समोर आला आहे. या प्रकारामुळे गावात आश्चर्य व्यक्त होत आहे. वासराच्या मालकाचे सदानंद मोरे असे नाव आहे. मागील आठवड्याभरापासून दिवसाकाठी हे वासरु दोन लिटर दूध देऊ लागले आहे. हा प्रकार बघण्यासाठी मोरे कुटुंबीयांच्या घरामध्ये वर्दळ वाढू लागली आहे. मोरे कुटुंबीयांच्या घरामध्ये नऊ जनावरे आहेत. त्यातील एका गायीने वासराला जन्म दिला आहे. हे वासरु 28 महिन्यांचे असले तरी गाभण नाही, शिवाय त्यांनी वासरालादेखील जन्म दिला नाही. मात्र आता ते दूध देऊ लागले आहे. या प्रकारामुळे कुटुंबीयांनाही आश्चर्य वाटू लागले आहे. मोरे कुटुंबीयांना या वासराच्या कासेचा आकार मोठा झाल्याचे निदर्शनास आले. दरम्यान त्यांनी कास दाबून बघितल्यानंतर त्यातून दूध आले. सध्या हे दूध डेअरीला घातले जात आहे. पशुपालक शेतीला जोड व्यवसाय म्हणून गाई, म्हशी आणि शेळ्या मेंढ्यांचे पालन करतात. अशावेळी जनावरातून दुर्मिळ घटना समोर येतात. बिजगर्णी येथे समोर आलेल्या या घटनेमुळे गावकऱ्यांतूनही तर्कवितर्क लावले जात आहेत.
एकदाही गाभण न जाता किंवा न विताच वासरु दूध देत आहे. कास मोठी झाल्याने बघितल्यानंतर त्यातून दूध आले. आता दररोज दोन लिटर दूध देऊ लागले आहे. आम्ही हे दूध डेअरीला घालत आहोत. याप्रकारामुळे आम्हाला आश्चर्य वाटू लागले आहे.
– सदानंद मोरे, (वासरु मालक)
असे प्रकार हार्मोन्सच्या बदलामुळे घडू शकतात. दहा हजार गाईंमध्ये अशी एखादी घटना पहायला मिळते. या वासरावर उपचार करून नैसर्गिकरित्या गाभण जाण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी जवळच्या पशु वैद्यकीयांकडून उपचार करून घ्यावेत.
– डॉ.आनंद पाटील (मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी)









