खात्याकडून लवकरच सर्वेक्षण : गुन्हा दाखल करण्याचा इशारा
बेळगाव : असंघटित क्षेत्रातील बांधकाम कामगारांना राज्य सरकारकडून अनेक योजनांचा लाभ करून दिला जात आहे. त्यांच्या कल्याणासाठी व विकासासाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या जात आहेत. त्यामुळे या योजनांचा लाभ घेण्याचा हव्यास वाढल्याने अनेक जणांनी बोगस कामगारकार्डे बनवून घेतली आहेत. याची सरकारला माहिती पडल्याने कामगार खात्याकडून कामगारकार्ड धारकांचा सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तत्पूर्वी बोगस कामगारकार्ड धारकांनी कार्डे परत करावी, अन्यथा दंडासहीत कारवाई करून कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा कामगार खात्याकडून देण्यात आला आहे. असंघटित कामगारांच्या क्षेत्रात मोडणाऱ्या बांधकाम कामगारांसाठी कामगार खात्याकडून अनेक लाभाच्या योजना राबविल्या जात आहेत. त्यामुळे इतर कामे करणाऱ्या कामगारांकडून बांधकाम क्षेत्रातील कामगारांना दिल्या जाणाऱ्या सेवा, सुविधा आम्हालाही मिळाव्यात यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी केली जात आहे. नुकतीच विणकर कामगारांनीही बांधकाम कामगारांना दिल्या जाणाऱ्या सेवा, सुविधांचा लाभ आम्हालाही मिळावा अशी मागणी केली आहे. त्यामुळे बांधकाम कामगारांसाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांकडे अनेक जणांचे लक्ष लागून आहे.
सदर योजनांचा लाभ घेण्यासाठी अनेक जणांकडून खोटी माहिती देऊन कामगार खात्याकडे नोंदणी केली असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे. याबाबत कामगार खात्याकडून सखोल चौकशी करण्याची तयारी करण्यात आली आहे. कामगार खात्याकडे बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केलेल्या कार्ड धारकांचा सर्वेक्षण करण्याची मोहीम आखली आहे. या पार्श्वभूमीवर कामगार खात्याकडून बोगस कामगार कार्ड नोंदणी धारकांना कार्डे परत करण्याचे आवाहन केले आहे. खोटी माहिती देऊन बांधकाम कामगारांप्रमाणे कामगार खात्याकडून दिल्या जाणाऱ्या सेवा, सुविधांचा लाभ घेतला आहे. संबंधित बोगस कार्डधारकांनी कार्डे परत करावीत, अन्यथा आतापर्यंत कामगार खात्याच्या ज्या सुविधांचा लाभ घेतला आहे त्यासहीत दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कामगार मंत्री संतोष लाड यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये बोगस कामगार कार्डांचा मुद्दा चांगलाच गाजला होता. अधिकाऱ्यांकडून एजंटांमार्फत बोगस कामगारकार्डे करून दिली असल्याची माहिती उघडकीस आली होती. यावरुन बांधकाम मंत्र्यांनी नोंद केलेल्या कामगारांच्या कार्डांचा सर्वेक्षण करून शोध घेण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली होती. त्या पार्श्वभूमीवर सदर सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली आहे.
बोगस कार्डांमुळे खऱ्या बांधकाम कामगारांना त्रास
बोगस कामगार कार्डांमुळे खऱ्या बांधकाम कामगारांना त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी सरकारने नवीन कामगार नोंदणी बंद ठेवली आहे. त्यामुळे बोगस कामगार कार्ड घेतलेल्यांनी कार्डे परत करावीत.
अॅड. एन. आर. लातूर-कामगार नेते









