शहरात तीन ठिकाणी वसतिगृहांची सोय
बेळगाव : महिला व बाल कल्याण खात्यामार्फत नोकरदार महिलांना निवासासाठी वसतिगृहे उभारण्यात आली आहेत. महिलांना यामध्ये प्रवेश दिला जात असून संबंधितांनी बालकल्याण योजना अधिकारी कार्यालय, जिल्हा बालभवन, श्रीनगर येथे अर्ज करावेत, असे आवाहन योजना अधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे. महिलांना सुरक्षितता मिळावी यासाठी शहरात तीन ठिकाणी वसतिगृहांची सोय करण्यात आली आहे. पिरनवाडी, आझमनगर आणि उद्यमबागमध्ये या वसतिगृहांची निर्मिती केली आहे. सरकारी, खासगी कंपन्या, हॉटेल आणि इतर ठिकाणी काम करणाऱ्या महिलांना यात प्रवेश दिला जाणार आहे. विशेषत: सवलतीच्या दरात महिलांना वसतिगृहे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. खासगी कंपन्या आदी ठिकाणी महिलांना कमी वेतनावर काम करावे लागते. त्यामुळे त्यांच्यासमोर निवाऱ्याचा प्रश्न निर्माण होतो. अशा महिलांसाठी या वसतिगृहांतून सवलतीच्या दरात प्रवेश दिला जातो. अलीकडे रात्रीच्या शिफ्टमध्येही महिला काम करू लागल्या आहेत. परराज्यांतून येणाऱ्या महिलांनाही या वसतिगृहात प्रवेश दिला जाणार आहे. या वसतिगृहात बेडरुम, शौचालये, स्नानगृहे आणि इतर सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.
महिलांना राहण्यासाठी वसतिगृहे…
महिलांना राहण्याची सोय व्हावी, यासाठी शहरात तीन ठिकाणी वसतिगृहे उभारण्यात आली आहेत. यामध्ये सर्व सोयीसुविधा उपलब्ध असून सवलतीच्या भाडे दरात उपलब्ध आहेत. यासाठी महिलांकडून अर्ज मागविले जात आहेत. प्रथम येणाऱ्या महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
रेवती होसमठ, कार्यक्रम अधिकारी, महिला व बालकल्याण अधिकारी.









