‘हिंडाल्को’च्या अॅसिडमिश्रित पाण्यामुळे पिकांची हानी : भरपाई देण्यात राजकारण होत असल्याचा आरोप
वार्ताहर/काकती
हिंडाल्को कंपनीच्या अॅसिडमिश्रित पाण्यामुळे हत्तीतट शिवारातील पिकांची हानी व जमिनी खराब झाल्याने नुकसान भरपाई देण्यास कंपनी तयार आहे. मात्र काही राजकारणी व अधिकारी शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई मिळवून देण्यास दिरंगाई करीत आहेत. अशांना न जुमानता मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांना भेटून झालेली नुकसान भरपाई मिळवून देण्यास भाग पाडूया. शुक्रवार 16 फेब्रुवारी रोजी शेतकरी बांधवांनी आपल्या कुटुंबासह सायंकाळी ‘चलो बेंगळूर’ असे आवाहन नेगलयोगी सुरक्षा रयत संघाचे राज्य कार्याध्यक्ष बसवनगौडा पाटील यांनी केले. होळी चौक काकती येथील लक्ष्मी मंदिर कट्टा येथे हत्तीतट शिवारातील अॅसिडमिश्रित पाण्याच्या नुकसानीबाबत नेगीलयोगी सुरक्षा रयत संघाच्यावतीने शेतकरी सभा पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शेतकरी नेते व राज्य वक्कूटचे अध्यक्ष बिराप्पण्णा देसनूर होते. व्यासपीठावर संघटनेचे संचालक महांतेश गौरी, संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्षा हेमा काजगार, तालुका अध्यक्ष मारुती नरेगवी, उपाध्यक्ष मोहन कंग्राळकर आदी उपस्थित होते.
30 संघटना सहभागी होणार
कार्यक्रमाला शेतकरी नाडगीताने सुरुवात झाली. स्वागत व प्रस्तावना हेमा काजगार यांनी केले. सभेत मार्गदर्शन करताना बसवनगौडा पाटील पुढे म्हणाले, काकतीला ऐतिहासिक वारसा असून राणी चन्नमाचे माहेर आहे. येथील शेतकरी फार संयमी आहेत. मात्र या शेतकरी बांधवांच्या पीक जमिनीची हानी होऊनही शांत आहे. आमच्या संघटनेचा उद्देश स्वार्थाचा नसून शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. शेतकऱ्यांना मिळणारी नुकसान भरपाई त्यांच्या सातबारातील एकर-गुंठेनुसार थेट बँक खात्यात जमा होणार आहे. नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी राज्यभरातील 30 शेतकरी संघटनांचा सहभाग राहणार आहे. बेंगळूरला जाण्यापासून ते परत येईपर्यंत शेतकरी संघटना खर्चाचा अधिभार उचलणार आहेत. शेतकरी बांधवांनो चलो विधानसौध बेंगळुर असे आवाहन केले. गावात सर्वाधिक ऊस पिकांचे उत्पन्न काढणारे प्रयोगशील शेतकरी कृष्णा मोळेराखी, मारुती मुचंडीकर व व्यासपीठावरील मान्यवरांचा शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी बसवंत कुंभार, भाऊराव मोळेराखी, मोहन कंग्राळकर, सिदाप्पा मोळेराखी, धाकलू नरेगवी आदी प्रगतीशील शेतकऱ्यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.









