प्रतिनिधी/ बेळगाव
कर्नाटक मराठा क्षत्रिय फेडरेशनच्यावतीने हिवाळी अधिवेशनादरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर चलो सुवर्णसौधची हाक देण्यात आली आहे. 20 डिसेंबर रोजी बेळगावच्या सुवर्णविधानसौधसमोर कर्नाटक राज्यातील मराठा समाजबांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. यासंदर्भाची घोषणा कर्नाटक मराठा फेडरेशनचे अध्यक्ष श्यामसुंदर गायकवाड यांनी केली आहे.
बेळगाव राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दि. 19 ते 29 डिसेंबरदरम्यान होणार आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणाकडे लक्ष वेधण्यासाठी कर्नाटक क्षत्रिय मराठा फेडरेशनच्यावतीने तयारी सुरू झाली आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला अलीकडे विविध आश्वासने दिली आहेत. त्यापैकी काही मागण्या मान्य झाल्या असल्या तरीही अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्यापैकी एक महत्त्वाची मागणी म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळावे. मराठा समुदायाला सध्या इतर मागास वर्ग 3 ब असे आरक्षण आहे. मात्र त्यांचा इतर मागास वर्ग 2 ए मध्ये समावेश करण्यात यावा, अशी प्रमुख मागणी मराठा फेडरेशनच्यावतीने करण्यात आली आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात कर्नाटक मराठा फेडरेशनच्यावतीने बेंगळूर आणि दिल्ली येथे विविध मान्यवर नेत्यांना निवेदन देऊन मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हिवाळी अधिवेशनादरम्यान मराठा फेडरेशनच्यावतीने चलो सुवर्णसौधची हाक देण्यात आली आहे. दि. 20 डिसेंबर रोजी होणाऱया चलो सुवर्णसौधची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे, असे कर्नाटक क्षत्रिय मराठा फेडरेशनचे बेळगाव जिल्हाध्यक्ष वैभव विलास कदम यांनी कळविले आहे.









