वाढीव वीजबिल मागे घेण्याची मागणी
बेळगाव ; विद्युत मंडळाकडून लागू करण्यात आलेल्या वाढीव वीजबिल विरोधात उद्योजक, व्यापारी व विविध संघटना आक्रमक झाले आहेत. वाढीव वीजबिल विरोधात कर्नाटक चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे गुरुवार दि. 22 जून रोजी कर्नाटक बंदची हाक देण्यात आली आहे. याला बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स तसेच इतर व्यापारी, उद्योजक व नागरिकांनी पाठिंबा दिला आहे. बेळगावमध्ये कडकडीत बंद पाळला जाणार असून शहरातून भव्य मूकमोर्चा काढला जाणार असल्याची माहिती बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष हेमेंद्र पोरवाल यांनी दिली. सोमवारी उद्यमबाग येथील बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात बेळगावमधील विविध उद्योजक संघटना, व्यापारी संघटना यांची संयुक्तरीत्या बैठक पार पडली. या बैठकीमध्ये गुरुवारी होणाऱ्या बंदबाबत चर्चा करण्यात आली. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपली मते मांडत बंद कशा पद्धतीने पाळला जाईल, या संदर्भात मते मांडली. विद्युत मंडळाने एफएससी तसेच वीजबिलामध्ये तीस ते साठ टक्केपर्यंत दरवाढ केली. याचा फटका उद्योजक, व्यापारी तसेच घरगुती ग्राहकांनाही बसला. तीन ते चारपट अधिक बिल आल्यामुळे हे कसे भरायचे, असा प्रश्न नागरिकांसमोर आहे. ही दरवाढ प्रत्येकाला परवडणारी नसल्याने या विरोधात उद्योजक, व्यापारी तसेच नागरिकांच्या संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. मागील आठवड्यात बेळगावमध्ये मोर्चा काढून एक आठवड्याचे सरकारला अल्टिमेटम देण्यात आले होते. कर्नाटक चेंबर ऑफ कॉमर्सने यापूर्वीच कर्नाटक बंदची हाक दिली होती. त्याला आता बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सने पाठिंबा दिला आहे.
असा पाळला जाणार कडकडीत बंद
गुरुवारी सकाळपासूनच बेळगावमधील सर्व औद्योगिक वसाहती, व्यापारीपेठा, बाजारपेठ, दुकाने बंद ठेवली जाणार आहेत. सकाळी दहा वाजता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूकमोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चामध्ये उद्योजक, औद्योगिक वसाहतीतील कामगार, नागरिक तसेच विविध संघटना सहभागी होणार आहेत. बैठकीमध्ये लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष महादेव चौगुले, फाउंड्रीमन असोसिएशनचे अध्यक्ष राम भंडारे, मायक्रो असोसिएशनचे रमेश देसुरकर, लघुउद्योग भारतीचे सचिन सबनीस, चेंबरचे सेक्रेटरी स्वप्निल शहा, हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष अजय पै, उद्योजक सुनील नाईक, रोहन जुवळी, बसवराज जुवळी, प्रभाकर नागरमुनोळी यांनी मार्गदर्शन केले.









