वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने (बीसीसीआय) रिक्त होणाऱ्या सहा निवड सदस्यांसाठी अर्जांची मागणी केली आहे. भारताच्या वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय क्रिकेट निवड समितीमध्ये पाच सदस्यांचा समावेश असून त्यापैकी दोन पदे रिक्त झाली आहेत. तसेच महिलांच्या निवड समितीतील चार सदस्य पदे रिकामी झाली असून त्यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
निवड समिती सदस्यपदासाठी बीसीसीआयने पूर्वीच्याच काही अटी कायम ठेवल्या आहेत. या पदासाठी इच्छुक असलेल्या अर्जदाराला किमान 7 कसोटी सामने किंवा 30 प्रथमश्रेणी सामन्यांचा अनुभव असणे जरुरीचे आहे. तसेच 10 वनडे किंवा 20 प्रथम श्रेणी सामने खेळलेल्या व्यक्तीला या पदासाठी अर्ज करता येतो. बीसीसीआयने प्रत्येकवर्षी निवड समिती सदस्यांबरोबरचा केलेला करार वर्षानंतर नुतनीकरण करत आहे. निवड समितीमधील रिक्त होणारी पदे कोणत्या विभागातील आहेत, हे अद्याप समजू शकलेले नाही. पण सध्या ही प्रक्रिया बीसीसीआयने हाती घेतली आहे. बीसीसीआयच्या विद्यमान निवड समितीने पुढील महिन्यात होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड नुकतीच केली आहे. निवड समितीचे अध्यक्षपद माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर भूषवित असून या निवड समितीमध्ये एस. एस. दास, सुब्रतो बॅनर्जी, अजय रात्रा आणि एस. शरद यांचा समावेश आहे. महिलांच्या निवड समितीतील चार पदे रिक्त झाली असून यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. महिलांच्या सध्याच्या क्रिकेट निवड समितीमध्ये नितू डेव्हीड, रेणू मार्गारेट, आरती वैद्य, कल्पना व्यंकटाचार्य आणि शामा डे शॉ यांचा समावेश आहे. महिलांच्या या निवड समितीने भारतात आगामी होणाऱ्या महिलांच्या आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड केली आहे. बीसीसीआयच्या निवड समितीतील रिक्त जागांसाठी इच्छुकांकडून 10 सप्टेंबरपर्यंत अर्जांची मुदत राहील.









