मध्यवर्ती म. ए. समितीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाचा खटला लवकरच पटलावर येणार आहे. त्यामुळे खटल्याला गती मिळावी यासाठी तज्ञ, तसेच उच्चाधिकार समितीची बैठक तातडीने बोलवावी. वरिष्ठ व कनिष्ठ अशा दोन्ही वकील आणि साक्षीदार यांची संयुक्त बैठक बोलावून त्रुटींची पूर्तता करावी, अशी मागणी मध्यवर्ती म. ए. समितीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून बैठक घेऊ, असे आश्वासन दिले.
समितीच्या शिष्टमंडळाने शनिवारी जयसिंगपूर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच सीमा समन्वय मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. एका कार्यक्रमासाठी ते जयसिंगपूर येथे आले असताना त्यांची भेट घेऊन सीमावासियांच्या मागण्या मांडण्यात आल्या. सीमाप्रश्नाचा खटला पटलावर येऊन त्याची लवकर सुनावणी व्हावी, यासाठी प्रयत्न करावेत. साक्षीदार व वकिलांची एक एकत्रित बैठक घेऊन त्यांच्या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी करण्यात आली.
एन. डी. पाटील यांचे स्वप्न साकार करणार
भाई एन. डी. पाटील यांनी सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आयुष्यभर प्रयत्न केले. सीमाप्रश्नाची सोडवणूक हे त्यांचे अर्धवट राहिलेले स्वप्न लवकरच साकार केले जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री पवार यांनी आपल्या भाषणावेळी दिले. तसेच तज्ञ व उच्चाधिकार समितीची बैठक मुख्यमंत्र्यांच्या संमतीने लवकरच बोलावू, असे त्यांनी समितीच्या शिष्टमंडळाला सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार रोहित पाटील यांच्यासह मध्यवर्ती म. ए. समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, खानापूर म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, गोपाळ पाटील, आबासाहेब दळवी, राजाराम देसाई उपस्थित होते.









