मध्यवर्ती म. ए. समितीची डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याकडे मागणी
बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाचा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या खटल्याला गती मिळावी यासाठी महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या तज्ञ व उच्चाधिकार समित्यांची बैठक तातडीने बोलवावी, अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने तज्ञ समितीचे सदस्य पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याकडे करण्यात आली. मध्यवर्ती म. ए. समितीच्या शिष्टमंडळाने बुधवारी कोल्हापूर येथे डॉ. जाधव यांची भेट घेऊन त्यांच्याकडे सीमावासियांची व्यथा मांडली. सध्या सुरू असलेल्या कन्नड सक्तीबाबतची माहिती त्यांना देण्यात आली. सीमावासियांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आपण महाराष्ट्र सरकार, तसेच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तज्ञ व उच्चाधिकार समितीची बैठक लवकर बोलाविण्यासाठी प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले. यावेळी मध्यवर्ती म. ए. समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, अॅड. एम. जी. पाटील, अॅड. अमर येळ्ळूरकर, कोल्हापूर येथील मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक यांसह इतर उपस्थित होते.









