अद्याप एकही बैठक झाली नसल्याने माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याकडे मागणी
बेळगाव : सीमाप्रश्नाचा सर्वोच्च न्यायालयातील दावा अधिक मजबूत करण्यासाठी उच्चाधिकार व तज्ञ समितीची बैठक होणे गरजेचे आहे. महाराष्ट्र सरकारने समन्वय मंत्र्यांची नेमणूक करून दोन महिने झाले तरी अद्याप एकही बैठक झाली नसल्याने आपण मध्यस्थी करून उच्चाधिकार समितीची बैठक बोलवावी अशी मागणी माजी जि. पं. सदस्य रामचंद्र मोदगेकर यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. म. ए. समितीच्या माध्यमातून मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येत होते. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विनंतीनंतर आंदोलन झाले नाही. त्यावेळी त्यांनी सीमाप्रश्नाच्या खटल्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार सीमा समन्वय मंत्र्यांची नेमणूक करण्यात आली. परंतु दोन महिन्यांत एकदाही बैठक सीमावासियांसोबत झालेली नाही. त्यामुळे या बैठकीसाठी आपण पुढाकार घ्यावा अशी मागणी शरद पवार यांच्याकडे करण्यात आली. म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी आंबोली (सावंतवाडी) येथे शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत सीमाप्रश्नाबाबत चर्चा केली. यावेळी म. ए. समितीचे सदस्य उपस्थित होते.









