शोधमोहीम तीव्र : बिबटय़ाचा थांगपत्ता नाहीच, नागरिकांमध्ये धास्ती कायम
प्रतिनिधी /बेळगाव
जाधवनगरमध्ये गवंडी कामगारावर हल्ला केलेल्या बिबटय़ाला पकडण्यासाठी वन खात्याने शोधमोहीम अधिक तीव्र केली आहे. मात्र, चार दिवसांचा कालावधी उलटला तरी अद्याप हाताला काहीच लागले नाही. रविवारी बागलकोट, दांडेली आणि गोल्याळी येथून आणलेले पिंजरेदेखील जाधवनगर आणि रेसकोर्स परिसरात लावण्यात आले आहेत. आतापर्यंत पंधरा ट्रपकॅमेरे आणि सहा पिंजरे लावले आहेत. मात्र, बिबटय़ाचा थांगपत्ता अद्याप लागला नाही. त्यामुळे बिबटय़ा कुठे गेला असेल? असा प्रश्न शहरवासियांना पडला आहे.
शुक्रवारी जाधवनगर येथे हल्ला केलेल्या बिबटय़ामुळे जाधवनगर, हनुमाननगर, सदाशिवनगर, बॉक्साईट रोड परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, वनखात्याकडून सावधगिरी बाळगण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. शिवाय बिबटय़ा निदर्शनास येताच वनखात्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. तीन दिवसांपासून दबा धरून असलेल्या बिबटय़ाने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. बिबटय़ा मानवी वस्तीत किंवा शहरात शिरल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. तसेच अलीकडे या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळेच बिबटय़ांची मानवी वस्तीकडील धाव रोखण्याचे मोठे आव्हान वनखात्यासमोर आहे.
पावसामुळे शोधमोहिमेत अडथळा
गतवषी याच परिसरातील म्हणजे रेसकोर्स परिसरात बिबटय़ासदृश प्राण्याचे दर्शन झाले होते. त्यानंतर ट्रपकॅमेऱयात ते रानमांजर असल्याचे स्पष्ट झाले होते. याबरोबरच हिंडाल्को आणि कुदेमनी परिसरात बिबटय़ा निदर्शनास आला होता. त्यामुळे अलीकडे बिबटय़ांचा मानवी वस्तीत वावर वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे वनखात्याने कायमस्वरुपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. रेसकोर्स परिसरात दाट झाडी असल्याने ससे, रानमांजर, मोर आणि भटक्मया कुत्र्यांची संख्या मोठी आहे. दरम्यान, बिबटय़ाचे आवडते खाद्य भटकी कुत्री असल्याने भक्ष्याच्या शोधार्थ हा बिबटय़ा आला असावा, असा अंदाज आहे. शिवाय या दाट झाडाझुडुपांमुळेच बिबटय़ाला शोधण्यात अडचणी येत आहेत. शिवाय दोन दिवसांपासून संततधार पावसामुळे शोधमोहिमेत अडथळा निर्माण होत आहे. मात्र, वनखात्याचे कर्मचारी रात्रंदिवस परिसरात तळ ठोकून आहेत. परिसरात लावलेले कॅमेरे आणि पिंजऱयात बिबटय़ा सापडतो काय? याचीच प्रतीक्षा वनखात्याला आणि नागरिकांना लागून आहे.
सहा वाजताच सामसूम
बिबटय़ाच्या धास्तीने सदाशिवनगर, जाधवनगर, हनुमाननगर आणि इतर परिसर सायंकाळी सहानंतर सामसूम होत आहे. परिसरातील घरांचे दरवाजे, खिडक्या बंद केल्या जात आहेत. त्याचबरोबर दुकानेदेखील बंद होत आहेत. रात्री बाहेर पडू नये, असे आवाहन वनखात्यानेदेखील केले आहे. त्यामुळे या परिसरात सायंकाळी सन्नाटा पसरत आहे.
नागरिकांनी सावध राहणे आवश्यक
बिबटय़ाच्या शोधासाठी 14 ट्रपकॅमेरे आणि 6 पिंजरे तैनात करण्यात आले आहेत. शिवाय कर्मचारीदेखील त्याठिकाणी ठाण मांडून आहेत. बिबटय़ा बाहेर पडताच फुटेज ट्रपकॅमेऱयात कैद होणार आहेत. तोपर्यंत परिसरातील नागरिकांनी सावध राहणे आवश्यक आहे.
– मल्लिनाथ कुसनाळ (एसीएफ वनखाते बेळगाव)









