सांखळी : डिंगणे-कुडणे सांखळी येथे गेल्या काही दिवसांपासून वावरणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी वन खात्याकडून डिंगणेत काल गुऊवारी रात्री पिंजरा लावण्यात आला. गेल्या 3 जून रोजी सीसीटीव्ही कॅमेरात बिबट्या दिसला होता. त्यानंतर या भागात खळबळ उडाली होती. लोकांची मागणी व परिस्थितीचे गांभीर्य पाहून वन खात्याने डिंगणेत पिंजरा लावला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वेळगे, पाळी, सुर्ल, कुडणे, न्हावेली, विर्डी, होंडा या भागात बिबटा सर्रासपणे वावरत आहे. अनेकांना त्याचे रस्त्यावर तसेच आपल्या घरांच्या परिसरात दर्शन घेतले आहे. लोकवस्तीत प्रवेश करून बिबट्या परिसरातील कुत्री, वासरेही पळवत असल्याने या भागात भीतीचे वातावरण निर्माण आहे. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून वन खात्याकडून सुर्ल, कडचाळ भागात सदर बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला होता. परंतु, पिंजऱ्या बिबटा अडकलाच नाही.
रात्रभर या भागातील अनेक गावांमध्ये वावरणाऱ्या बिबट्याची छबी गेल्या 3 जून रोजी रात्री डिंगणेतील रॉकी बारच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. सदर व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली. याची दखल घेत केरी विभागीय वन कार्यालयाचे वनाधिकारी सेबॅस्टीव फर्नांडिस यांनी गुऊवारी सकाळी स्वत: डिंगणेत जाऊन पाहणी केली. या परिसरातील लोकांशी चर्चा केल्यानंतर डिंगणेत पिंजरा लावण्याचे निश्चित केले. अखेर संध्याकाळी वन खात्याचे कर्मचारी पिंजरा घेऊन डिंगणेत दाखल झाले व रात्री त्यांनी सदर पिंजरा बिबटा येजा करणाऱ्या ठिकाणी लावला. या पिंजऱ्याच्या मागे अन्य एक छोटा पिंजरा लावून त्यात भक्ष्याचे आमिष म्हणून कुत्र्याचे पिल्लू ठेवण्यात आले आहे. या पिल्लाच्या नादात बिबटा पिंजऱ्यात आल्यास मोठ्या पिंजऱ्यात तो अडकणार, अशी व्यवस्था केली आहे. दरम्यान, या परिसरात सायंकाळनंतर बिबट्याचा वावर असतो त्यामुळे रात्री काळोखात परिसरात फिरू नये. स्वत:ची काळजी घेत सतर्क रहावे, असे आवाहन वन खात्याकडून करण्यात आले आहे.









