सातारा :
जिल्हा बँकेच्या गटसचिवांचे केडर 2009 साली बरखास्त करण्यात आले होते. ते पुन्हा स्थापन करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा माजी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे, मंत्री मकरंद पाटील, आम्ही सगळयांनी प्रयत्न केले. आज गटसचिवांसाठी सोन्याचा दिवस आहे, असे मत जिल्हा बँकेचे चेअरमन तथा खासदार नितीन पाटील यांनी व्यक्त केले. जिल्ह्यातील 587 गटसचिवांना केडर नियुक्तीचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्या हस्ते आदेश प्रदान करण्यात आले.
जिल्हा बँकेच्या सभागृहात जिल्हा बँकेच्या गटसचिवांना केडरचा नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आला. त्यावेळी चेअरमन नितीन पाटील, व्हाईस चेअरमन अनिल देसाई, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे, संचालक सत्यजितसिंह पाटणकर, सुनील खत्री, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
खासदार नितीन पाटील म्हणाले, आजचा दिवस सचिवांच्या दृष्टीने महत्वाचा, आनंदाचा, भाग्याचा आहे. गेले अनेक वर्ष सचिवांचा संघर्ष सुरु होता. जिल्हास्तरीय सचिवांना नोकरीची हमी नव्हती. त्यामुळे सातारा जिल्हा बँकेने प्रथमपासून सातत्याने पाठपुरावा केला आहे. 2009 ला केडर बरखास्त झाले तेव्हापासून सातत्याने जिल्हा बँकेच्या सगळ्या संचालक मंडळाने रामराजे, शिवेंद्रराजे, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, मकरंद आबांनी सातत्याने पाठपुरावा करुन त्यास यश आले. आजचा हा दिवस आलेला आहे. यापुर्वी सुद्धा केडर बरखास्त झाली होती.
त्या कालावधीत असलेले संचालक विलासकाका, अभयसिंह महाराज, लक्ष्मण तात्या, घार्गे साहेब या मंडळींनी हायकोर्टात जावून स्टे घेतला होता. तो आजपर्यंत तसाच आहे. राज्यातील इतर केडर बरखास्त झाले पण जिह्यातील केडर अस्तित्वात आहे. 2009 मध्ये वैद्यनाथ कमिटी आली. सोसायट्यांना सचिव निवडीचे अधिकार दिले. सोसायटीच्या संचालकांनी त्यांना जो सचिव हवा तो घ्यावा. त्यामुळे स्थानिक पातळीवर राजकारणाचा इफेक्ट त्यावर होत होता. एका गटाकडे संस्था असली आणि त्यांनी निवड केलेला सचिव दुसऱ्या गटाकडे सत्ता गेल्यानंतर त्यास काढण्याचे प्रकार झाले. सचिवांना जे केडरचे संरक्षण होते. त्यापासून ते अलिप्त राहिल्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत होता. हे आमच्या निदर्शनास आल्यानंतर सातत्याने बँकेने राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. सहकार मंत्र्याच्या सोबत बैठक झाली. त्यांनी तत्वत: मान्यता दिली. त्यानंतर प्रक्रिया पूर्ण होवून या निवडीची प्रक्रिया पूर्ण होत आहे. तसेच ज्या सोसायट्यामध्ये सहसचिव आहेत. त्यांच्याही निवडीकरता सहकार्य करावे, अशी विनंती त्यांनी केली.
माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, सहकार आयुक्त दीपक तावरे यांनीही आपली मते मांडली. सूत्रसंचालन सचिन अनपट यांनी केले. प्रास्तविक डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी केले. आभार जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी मानले. नव्याने निवड झालेल्या गटसचिव संघटनेच्यावतीने बँकेचे चेअरमन खासदार नितीन काका पाटील, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, सहकार आयुक्त दीपक तावरे यांचा सत्कार करण्यात आला.








