राजौरीतील मृत्यूप्रकरणी केंद्रीय मंत्र्यांकडून खुलासा : विषारी पदार्थाचा स्रोत जाणून घेण्यासाठी तपास
वृत्तसंस्था/ जम्मू
जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये रहस्यमय आजारामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांवरून नवा खुलासा झाला आहे. वैद्यकीय पथकाच्या तपासणीत मृतांच्या शरीरात एक घटक आढळून आला आहे. ग्रामस्थांच्या मृत्यूचे कारण हे आजारामुळे नव्हे तर कॅडमियम विषामुळे झाला असल्याची माहिती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी शुक्रवारी दिली आहे.
लखनौ येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टॉक्सिकोलॉजी रिसर्चच्या संशोधकांनी मृतांच्या शरीरात कॅडमियम नावाचे टॉक्सिन असल्याचा अहवाल दिला आहे. परंतु हे कॅडमियम संबंधित लोकांच्या शरीरात कसे पोहोचले याचा तपास आता केला जात आहे. राजौरी जिल्ह्यातील बधाल गावात 7 डिसेंबरपासून आतापर्यंत सुमारे 48 दिवसांमध्ये 13 मुलांसमवेत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्व मृत्यू गावातील तीन परिवारांमध्ये झाले असल्याने अनेक पैलूंवर तपास केला जात आहे. या परिवारांशी संबंधित अन्य 38 जण ही टॉक्सिनने प्रभावित झाले आहेत.
यापूर्वी प्राथमिक तपासणीत कुठलाही विषाणू किंवा बॅक्टेरियामुळे संबंधित लोकांचा मृत्यू झाला नव्हता असे स्पष्ट झाले हेते. संबंधित विषारी घटक जाणूनबुजून लोकांच्या शरीरात पोहोचविण्यात आला असेल तर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे जितेंद्र सिंह यांनी सांगितले आहे.
काय आहे कॅडमियम?
जागतिक आरोग्य संघटनेनुसार कॅडमियम मानवी शरीरासाठी अत्यंत घातक पदार्थ आहे. कॅडमियममुळे किडनी, स्केलिटन आणि श्वसनप्रणालीशी निगडित आजार मोठ्या प्रमाणावर होतात. तसेच मानवी शरीरात कॅन्सरसारखा जीवघेणा आजारही निर्माण होतो. कॅडमियमचा प्रभाव प्रामुख्याने मुलांमध्ये लवकर दिसून येतो. कॅडमियम हा अत्याधिक विषारी धातू आहे. जो शरीरात पोहोचताच अनेक गंभीर आजारांचे कारण ठरतो. दूषित भोजन, अस्वच्छ पाणी, प्रदूषित वातावरणात श्वसन केल्यामुळे लोक कॅडमियमच्या संपर्कात येऊ शकतात. कॅडमियम युक्त इलेक्ट्रॉनिक, विद्युत उपकरणे, खेळणी, दागिने आणि प्लास्टिकच्या रिसायकलिंगमुळेही पॉइजनिंग होऊ शकते.
बधाल गावात जीवघेणे संकट
जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील बधाल गावात मागील दीड महिन्यांपासून जीवघेणे संकट आहे. यामुळे आतापर्यंत 17 जणांना जीव गमवावा लागला आहे. अचानक होणाऱ्या या मृत्यूंच्या घटना कळल्यावर प्रशासन सक्रिय झाले आणि या परिवारांच्या संपर्कात आलेल्या 200 जणांना क्वारंटाईन करण्यात आले. याचबरोबर प्रशासनाने गावातील एक स्थानिक जलस्रोतही बंद केला आहे. याच्या पाण्याची चाचणी केली असता त्यात विषारी घटक असल्याची पुष्टी झाली होती. या गावातील लोकांनुसार संबंधितांचा मृत्यू होण्यापूर्वी त्यांना ताप, अंगदुखी आणि मोठ्या प्रमाणात घाम येणे अशाप्रकारची लक्षणे दिसून आली होती.
जपानमध्ये घडली होती घटना
जपानच्या टोयामा प्रांतात 1912 मध्ये कॅडमियम पॉइजनिंगमुळे अनेक जणांचा मृत्यू झाला होता. जपानमध्ये तेव्हा या आजाराला इटाई-इटाई नाव देण्यात आले होते. तेव्हा खाणींमधून निघालेल्या धातूंमुळे नदीचे पाणी अन् माती प्रदूषित झाली होती. या प्रदूषित पाण्याने भातशेतीला प्रदूषित केले होते. यामुळे लोकांमध्ये दीर्घकाळापर्यंत कॅडमियमचा प्रभाव कायम राहिला होता.









