नागेश छाब्रिया यांची माहिती : चॅनेल्सच्या दरवाढीचा परिणाम
बेळगाव : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय)ने सुधारित दर जाहीर केले आहेत. त्यामुळे चॅनेल्सनी आपल्या दरात वाढ केली. यामुळे आपसुकच केबल सेवेचे दर वाढले आहेत. 1 एप्रिलपासून केबलच्या दरात वाढ करण्यात आली असल्याची माहिती मेट्रो कास्ट नेटवर्क इंडिया लि. चे व्यवस्थापकीय संचालक नागेश छाब्रिया यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. मेट्रो कास्ट नेटवर्क उत्तर कर्नाटकसह गोवा, महाराष्ट्र व पश्चिम बंगाल या ठिकाणी केबल सेवा पुरविते. 5 लाखांहून अधिक ग्राहक कंपनीने जोडले आहेत. मागील 30 वर्षांमध्ये कंपनीने ग्राहकांना उत्तम व माफक सेवा दिली आहे. परंतु सध्या स्पर्धेच्या जगामध्ये दरवाढ करण्याव्यतिरिक्त कंपनीला पर्याय नाही. सर्वच चॅनेल्सनी आपल्या दरात वाढ केल्यामुळे ग्राहकांना आता वाढीव दराने केबल पॅकेज घ्यावे लागेल. ट्रायने नवे दर जाहीर केल्याने स्टार, झी, डिस्ने, कलर्स, सन, टर्नर व इतर बड्या ब्रॉडकास्टर्सनी 1 एप्रिलपासून दर वाढविले आहेत. दरवाढ करताना प्रादेशिक चॅनेल्सचे दर सर्वाधिक वाढविण्यात आले आहेत. मराठी, कन्नड यासारख्या प्रादेशिक चॅनेल्सचे दर 10 ते 40 टक्क्यांनी वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे ग्राहकांना यापुढे वाढीव दराने केबल पॅकेज खरेदी करावे लागणार असल्याचे छाब्रिया यांनी सांगितले. चॅनेल्सने दरवाढ केल्याने केबल ऑपरेटरलाही आता नाईलाजास्तव दरवाढ करावी लागणार आहे. ओटीटी अॅप प्रादेशिक चॅनेल देत नसल्याने केबलवरील चॅनेलचे दर वाढविण्यात आले आहेत. कोरोना व त्यानंतरच्या काळात सर्व सेवांचे दर वाढले असतानाही केबलचे दर स्थिर होते. आता मात्र मनोरंजनासाठी अधिक पैसे खर्च करावे लागणार आहेत. ग्राहकांना डायमंड पॅकसारख्या पॅकमधून मोफत इंटरनेट दिले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी ईन न्यूजचे संपादक राजशेखर पाटील व संतोष पर्वतराज उपस्थित होते.









