भाजप राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांची माहिती
पणजी : मंत्रिमंडळात योग्य वेळी योग्य ते फेरबदल करण्यात येतील. त्याबद्दल आताच चिंता नको, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी केले. तत्संबंधी विचारलेल्या एका प्रश्नावर ते बोलत होते. राज्य मंत्रिमंडळात येत्या काही दिवसांत फेरबदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यासह काँग्रेसच्या किमान दोन आमदारांना मंत्रिमंडळात सामावून घेण्यात येईल, अशी चर्चा सुरू असल्यामुळे सर्वांची उत्कंठा वाढीस लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी गोवा भेटीवर आलेले संतोष यांना प्रश्न विचारण्यात आला होता. गेल्या वर्षी निवडणुकीत विजयी झालेल्या काँग्रेसच्या 11 मधील 8 आमदारांनी भाजपात प्रवेश केला. त्यात दिगंबर कामत, राजेश फळदेसाई, अलेक्स सिक्वेरा, मायकल लोबो, डिलायला लोबो, संकल्प आमोणकर, केदार नाईक आणि ऊडॉल्फ फर्नांडिस यांचा समावेश होता. या आमदारांच्या प्रवेशामुळे 40 सदस्यीय विधानसभेत भाजपकडे तब्बल 28 आमदारांचे संख्याबळ झाले होते. मात्र सदर आठ आमदारांपैकी कुणाचीच वर्णी मंत्रिमंडळात लागलेली नाही. त्यावरून त्यांच्यात नैराश्य पसरले आहे. आज-उद्या करत आपणाला झुलवत ठेवल्याची भावना त्यांच्यात झाली आहे. त्यासंबंधी यापूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनाही विचारण्यात आले होते. परंतु कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. दसरा किंवा दिवाळीनंतर ते होऊ शकते, एवढेच ते म्हणाले होते.









