परिवहन मंत्री रामलिंगारेड्डी यांचे स्पष्ट संकेत
बेंगळूर : राजकीय वर्तुळात मंत्रिमंडळ पुनर्रचनेविषयी चर्चा रंगली असतानाच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोमवारी रात्री मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसाठी भोजनावळीचे आयोजन केले होते. या निमित्ताने त्यांनी मंत्रिमंडळ पुनर्रचनेसह विविध मुद्द्यांवर चर्चा केली. दरम्यान, मंगळवारी सकाळी परिवहन मंत्री रामलिंगारेड्डी यांनी डिसेंबरमध्ये मंत्रिमंडळ पुनर्रचना होणार असल्याचे संकेत दिले. आमच्यात 7 ते 8 ज्येष्ठ आमदार आहेत, त्यांना देखील संधी नको का?, असे सांगून त्यांनी मंत्रिमंडळ पुनर्रचना होणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पक्षश्रेष्ठींच्या सूचनेवरून मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांसोबत चर्चा करण्यासाठी भोजनावळीचे आयोजन केले होते. सरकारच्या पुढील अडीच वर्षाच्या कार्यकाळात पक्षनिष्ठ आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्याबाबत यावेळी चर्चा झाली. याला अनुसरून मंगळवारी रामलिंगारेड्डी यांनी डिसेंबरमध्ये मंत्रिमंडळ पुनर्रचनेचे स्पष्ट संकेत दिले आहेत.









