कुठलीच नरमाई बाळगणार नाही ः स्टॅलिन
वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन लवकरच स्वतःच्या मंत्रिमंडळात फेरबदल करणार आहेत. स्वतःच्या मंत्रिमंडळातील सदस्यांच्या कामगिरीनुसार स्टॅलिन हे फेरबदल करू पाहत आहेत. 2 मे रोजी मंत्रिमंडळाची बैठक होणार असून ती अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. काही मंत्र्यांच्या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री आनंदी नसल्याचे समजते. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर फेरबदल केला जाण्याची शक्यता आहे.
मुख्य सचिव व्ही. इराई अंबु आणि पोलीस महासंचालक सी. सिलेंद्रबाबू लवकरच सेवानिवृत्त होणार आहेत. यामुळे नोकरशाहीत देखील मोठा बदल होणार आहे. मंत्रिमंडळ फेरबदलादरम्यान सरकारच्या सचिवांमध्येही देखील फेरबदल केला जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
जो काम करणार नाही, त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची नरमाईची भूमिका दाखविली जाणार नाही तसेच कठोर मेहनत करत लोकांसाठी चांगले काम करणे हाच सरकारचा उद्देश असल्याचे मुख्यमंत्र्यांनी अलिकडेच एका बैठकीत पक्षाच्या मंत्र्यांना उद्देशून म्हटले होते. या बैठकीत स्टॅलिन यांनी काही मंत्र्यांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केल्याचे समजते.
पक्षाच्या मंत्र्यांनी सर्वोत्तम कामगिरी न केल्यास जनतेत नाराजी निर्माण होईल अशी भीती स्टॅलिन यांना सतावत आहे. फेरबदलाची योजना अलिकडेच द्रमुकच्या जिल्हा सचिवांसोबत मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर तयार करण्यात आली होती. राज्यात अण्णाद्रमुक तसेच भाजपकडून द्रमुक विरोधात वातावरण निर्मिती केली जात असल्याने स्टॅलिन सतर्क झाले आहेत.









