दिल्लीहून परतले तवडकर, आज हालचालींना वेग : तवडकर, कामत यांची मंत्रिमंडळात लागणार वर्णी
पणजी : सभापती रमेश तवडकर यांनी मंत्रीपद स्वीकारण्याचे मान्य केले, तर आजच त्यांना सभापतीपदाचा राजीनामा द्यावा लागेल. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर लगेच राजकीय हालचाली सुरू होतील. नवी दिल्लीला गेलेले सभापती तवडकर हे काल सोमवारी रात्री उशिरा गोव्यात परतले. त्यांची गोव्यात परतल्यानंतर मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष यांच्याबरोबर चर्चा होणार होती. रात्री उशिरापर्यंत ही चर्चा झाली नाही, ती आज सकाळी होईल. त्यानंतर सभापतींनी मंत्रीपद स्वीकारण्याचे ठरविले तर सायंकाळपर्यंत ते सभापतीपदाचा राजीनामा उपसभापतींकडे सादर करतील.
दोघानांच मिळणार मंत्रीपदे
डॉक्टर प्रमोद सावंत मंत्रिमंडळात तीन ऐवजी आता केवळ दोनच मंत्र्यांना समाविष्ट करून घेतले जाणार आहे. तवडकर आणि मडगावचे आमदार दिगंबर कामत, यांच्या नावावर पक्षश्रेष्ठीनी शिक्कामोर्तब केलेले आहे. तवडकर यांच्या निर्णयावर सारे काही अवलंबून आहे. तवडकर यांनी आपण आहे त्या पदावर योग्य आहे असे म्हटलेले आहे. आता पक्षाच्या कामात त्यांनी सहभागी व्हावे याकरिता पक्षश्रेष्ठींनी त्यांना मंत्रिमंडळात सहभागी व्हावे, असे कळविलेले आहे. नवी दिल्लीला गेलेल्या तवडकर यांनी भाजपच्या कोणत्या नेत्यांशी चर्चा केली याचा तपशील समजू शकला नाही. मात्र शनिवारपर्यंत मंत्रिमंडळाची पुनर्रचना होणार हे निश्चित आहे. आज काही हालचाली होण्याच्या शक्यता आहे. सांगेचे आमदार तथा मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सभापतीपद स्वीकारण्याचे ठरविले तर तिसरा मंत्री म्हणून मायकल लोबो यांना संधी मिळू शकते.









