मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा दहशतवादाला धडा
वृत्तसंस्था / श्रीनगर
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये या केंद्रशासित प्रदेशाच्या मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली आहे. याच पहलगाममध्ये 22 एप्रिलला धर्मांध दहशतवाद्यांनी क्रूर हल्ला करुन 26 बळी घेतले होते. आम्ही अशा भ्याड हल्ल्यांना घाबरत नाही, असा संदेश या कृतीतून या प्रदेशाचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना दिला आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
ओमर अब्दुल्ला जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री झाल्यापासून राजधानी श्रीनगर किंवा हिंवाळी राजधानी जम्मू ही दोन स्थाने सोडून अन्य स्थानी मंत्रिमंडळाची बैठक घेतली जाण्याची ही प्रथम वेळ आहे. ही मंत्रिमंडळ बैठक केवळ प्रतिकात्मक नव्हती. या प्रदेशात पुन्हा पर्यटन व्यवसाय बहरावा, हे हेतूने पहलगाम येथे ती आयोजित करण्यात आली होती, अशी माहिती देण्यात आली आहे.
दहशतवाद्यांना संदेश
या बैठकीची माहिती स्वत: अब्दुल्ला यांनी सोशल मिडियावर पोस्ट केली आहे. मी स्वत: या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होतो. ही बैठक केवळ एक नियमित प्रशासकीय उपचार या प्रकारची नव्हती. या बैठकीतूत आम्ही दहशतवाद्यांना संदेश दिला आहे, की आम्ही त्यांच्या भ्याड हल्ल्यांना भिणार नाही. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात ज्यांनी प्राण गमावले, त्यांच्या साहसाला प्रणाम करण्यासाठी तिचे आयोजन याच स्थानी करण्यात आले होते. शांततेचे शत्रू आमच्या निर्धारावर कधीही मात करु शकणार नाहीत, असा स्पष्ट संदेश आम्ही दहशतवाद्यांना आणि त्यांच्या पालनकर्त्यांना दिला आहे. जम्मू-काश्मीर दहशतवादाच्या विरोधात भक्कमपणे उभा आहे, असे प्रतिपादन अब्दुल्ला यांनी संदेशात केले आहे.
पर्यटनावर परिणाम
पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांच्या संख्येत मोठी घसरण झाली आहे. यामुळे पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या स्थानिकांची कोंडी झाली आहे. अशा स्थितीत पहलगाम येथे बैठक घेतल्याने भारतातील लोकांनाही काश्मीर सुरक्षित असल्याचा संदेश दिला गेला आहे. भारतातील आणि जगातील अधिकाधिक लोकांनी काश्मीरला पर्यटनासाठी यावे. प्रदेश सरकार त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. पर्यटन वाढविण्यासाठी प्रदेश सरकारने अनेक योजना लागू केल्या आहेत. त्यांचा परिणाम दिसून येऊ लागला आहे. महाराष्ट्रातील 60 हून अधिक पर्यटन कंपन्या आणि व्यावसायिकांनी पुन्हा काश्मीरला पर्यटकांना घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या सरकारने या साऱ्यांचे आभार मानले आहेत. पर्यटन हे राजकारण आणि संघर्ष यांच्यापासून मुक्त असले पाहिजे, अशी आमच्या सरकारची इच्छा आहे, अशी स्पष्टोक्ती ओमर अब्दुल्ला यांनी संदेशात केली आहे.
पंतप्रधान मोदी यांना विनंती
नीती आयोगाच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीला ओमर अब्दुल्ला उपस्थित होते. केंद्र सरकारने आपल्या सार्वजनिक उद्योगांच्या बैठका जम्मू-काश्मीरमध्ये आयोजित कराव्यात. तसे केल्याने या प्रदेशात भारतातून लोक मोठ्या संख्येने येऊ लागतील, अशी विनंती त्यांनी या बैठकीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली होती. केंद्र सरकारने सांसदीय समित्यांच्या बैठकांचेही आयोजन जम्मू-काश्मीरमध्ये करावे. यामुळे लोकांचे नीतीधैर्य वाढीस लागेल आणि त्यांच्या प्रशासनावरच्या विश्वासात वाढ होईल, असे अब्दुल्ला यांचे म्हणणे आहे.
राजकीय उपयोग करणार नाही
पहलगाम हल्ल्याचे निमित्त पुढे करुन मी जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी केंद्र सरकारकडे करणार नाही. सध्याची परिस्थिती अशी मागणी करण्यायोग्य नाही. पहलगाम हल्ल्याचा राजकीयदृष्ट्या असा उपयोग करणे मला मान्य नाही, असेही प्रतिपादन ओमर अब्दुल्ला यांनी संदेशात केले आहे.









