मंत्री जमीर अहमद खान यांचे वक्तव्य
बेंगळूर : कोणत्याही क्षणी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. 10 दिवसांत बी. नागेंद्र पुन्हा मंत्री बनतील, असे वक्तव्य गृहनिर्माण मंत्री जमीर अहमद खान यांनी केले आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाची पुनर्रचना होणार की विस्तार, याविषयी राजकीय वर्तुळात कुतूहल निर्माण झाले आहे. बळ्ळारी येथे सोमवारी पत्रकारांशी बोलताना मंत्री जमीर अहमद खान यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य केले. वाल्मिकी विकास निगममधील निधीचा दुरुपयोग प्रकरणामुळे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या बी. नागेंद्र यांना पुन्हा मंत्रिमंडळात सामील केले जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. कोणत्याही क्षणी मंत्रिमंळाचा विस्तार होऊ शकतो, निर्णय आमच्या हातात नाही. हायकमांड ठरविणार आहे. बी. नागेंद्र हे पुन्हा मंत्री बनतील. 10 दिवसांत बी. नागेंद्र यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार आहे. सिद्धरामय्या हेच पाच वर्षांच्या कालावधीसाठी मुख्यमंत्रिपदावर राहतील, असे त्यांनी म्हटले आहे. बळ्ळारी जिल्ह्यात कोणतीही विकासकामे प्रलंबित नाहीत. सर्व कामे सुरू आहेत. नागेंद्र यांच्यामार्फत समस्यांविषयी मला माहिती मिळत आहे. बळ्ळारीत साहित्य संमेलन भरविण्यासाठी चार ठिकाणे निवडण्यात आली आहेत, बळ्ळारीतील आमदारांसमवेत ठिकाणांची पाहणी करेन. येथे भव्य प्रमाणात साहित्य संमेलन होणार आहे, असेही जमीर अहमद खान यांनी सांगितले.









