मोदी सरकारचा मोठा निर्णय : बैठकीतील नेमकी चर्चा गुलदस्त्यात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महिलांना 33 टक्के आरक्षण देण्यासंबंधीच्या विधेयकाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. संसदेच्या विशेष अधिवेशनादरम्यान सोमवार, 18 सप्टेंबर रोजी संध्याकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात पंतप्रधान मोदी आणि इतर मंत्री सहभागी झाले होते. बैठकीत कोणते निर्णय घेण्यात आले याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, मात्र या बैठकीत महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्याचा दावा प्रसारमाध्यमांनी केला आहे. बुधवारी किंवा गुरुवारी यासंबंधीचे विधेयक सभागृहात मांडले जाणार असून त्यानुसार महिलांना 33 टक्के आरक्षण प्रस्तावित आहे.
सोमवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळ बैठक बोलावल्याने यातील निर्णयांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. संसदेच्या अॅनेक्सी इमारतीत सुरू झालेली मोदी मंत्रिमंडळाची बैठक जवळपास दीड तासाने संपली. मात्र, मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत निर्णयांची माहिती न दिल्यामुळे कोणत्या विषयांवर चर्चा झाली याची माहिती गुलदस्त्यातच राहिली आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषद घेण्याची परंपरा आहे, मात्र यावेळी तसे झालेले दिसत नाही. मंत्रिमंडळात घेतलेल्या निर्णयांची माहिती थेट संसदेला दिली जाणार असल्याचे समजते. तरीही या बैठकीत महिला आरक्षण विधेयकावर चर्चा झाली असून आता बुधवार, 20 सप्टेंबर रोजी दोन्ही सभागृहांचे नियोजित कामकाज सुरू झाल्यानंतरच कॅबिनेटमध्ये झालेल्या निर्णयांवर प्रकाशझोत पडेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी सोमवारी संध्याकाळी संसद भवनात अनेक महत्त्वाच्या बैठका झाल्याचेही समजते. मिळालेल्या माहितीनुसार, वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियूष गोयल आणि संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या बैठकीला भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा ही उपस्थित होते. यानंतर पियूष गोयल आणि प्रल्हाद जोशी यांनी एकत्रितपणे पंतप्रधान मोदींची भेट घेतली. एकंदर, मंत्र्यांच्या पातळीवर धावपळ सुरू असल्याचे चित्र संसद भवनात दिसून येत होते.
मंत्रिमंडळ बैठकीत संसदेचे अधिवेशन जुन्या इमारतीतून नव्या संसद भवनात हलवण्यास मंजुरी देण्यात आली असावी. याशिवाय अधिवेशन काळात मांडण्यात येणाऱ्या विधेयकाबाबतही महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाऊ शकतो. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंत्र्यांची बैठक घेतली. संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांच्या दालनात ही बैठक बोलावण्यात आली होती. मंत्री प्रल्हाद जोशी, धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव, अनुराग ठाकूर, अर्जुन राम मेघवाल आणि व्ही मुरलीधरन या बैठकीला उपस्थित होते. मात्र, या बैठकीत काय चर्चा झाली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
संसदेचे पाच दिवसीय विशेष अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले आहे. हे विशेष सत्र 22 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. तत्पूर्वी, रविवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत सरकारने 8 विधेयके मांडणार असल्याची माहिती विरोधकांना दिली. सोमवारी सकाळी जुन्या संसद भवनात अधिवेशनाचा पहिला दिवस पार पडला. या कामकाजात जुन्या संसद भवनाला निरोप देताना पंतप्रधानांसह काही नेत्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज मंगळवार दुपारपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. संसदेचे विशेष अधिवेशन सोमवारी जुन्या इमारतीतच सुरू झाले असले तरी 19 सप्टेंबर रोजी होणारी बैठक नव्या संसद भवनात होणार आहे. 20 सप्टेंबरपासून संसदेच्या नवीन इमारतीतूनच सर्व कामकाज केले जाणार आहे.









