शेतकऱ्याचे आर्थिक गणित कोलमडले : काढणीचा खर्चही निघत नसल्याने हवालदिल
वार्ताहर/उचगाव
बेळगाव तालुक्यात भाजीपाल्याचा दर घसरत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्या कोबी पिकाला भाजीमार्केटमध्ये कवडीमोल दर मिळत असल्याने कोबी पीक शेतातच सडून जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. दरवर्षी शेतकरी वेगवेगळ्या पिकांचा भाजीपाला करण्यामध्ये गुंतलेला असतो. कोथिंबीर, भेंडी, बावची, मुळा, लाल भाजी, नवलकोल, कोबी, वांगी या सर्व पिकांची लागवड करून चार पैसे हाती मिळतील आणि आपला उदरनिर्वाह चालेल, या उद्देशाने शेतकरी राबत असतो. मात्र शासनाच्या धोरणानुसार निश्चित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणितच कोलमडून पडते. संपूर्ण बेळगाव तालुक्यात कोबी पीक जोमात आले होते. मात्र बेळगाव मार्केटमध्ये कोबीला कवडीमोल दर असल्याने पिकाची काढणी करून बेळगाव मार्केटपर्यंत पोहोचविण्याचा खर्चदेखील निघत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेतामध्येच हातातोंडाशी आलेली हे पीक तसेच सोडून दिल्याचे दिसून येत आहे.
किमान दर देण्याची मागणी
शेतामध्ये दुसऱ्या पिकाची आखणी करण्यासाठी आधीचे पीक काढणे गरजेचे असते. यासाठी या पिकांमधून जनावरे, शेळ्या मेंढ्या सोडल्यास त्यांचे तरी पोट भरेल या उद्देशाने पिकांमधूनच जनावरांना सोडल्याचे चित्र दिसून येत आहे. या पिकाला वाहतूक व मजुरीचा खर्च निघेल इतकाही दर सध्या मिळत नसल्याने शेतातच सोडून देण्याची वेळ आली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. अशावेळी शासनाने पिकाची खरेदी करून किमान दर देण्याची नितांत गरज आहे, असे अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
शासनाने निश्चित दर देऊन नुकसान टाळावे
यावर्षी एक एकर जमिनीमध्ये कोबीपीक लागवड केली होती. जर याला चांगला दर आला असता तर चार पैसे हाती मिळाले असते. मात्र मार्केटमध्ये दरच नसल्याने आणि सदर कोबी पीक मार्केटपर्यंत पोचवण्यासाठी होणारा खर्चाच्या भीतीने शेतवडीतून हे पीकच आम्ही काढले नाही. परिणामी मोठ्या आर्थिक संकटात सध्या आम्ही आहोत. यासाठी अशा पिकांना शासनाने निश्चित दर देऊन शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळावे.
– दत्ता कित्तूर, कल्लेहोळ









