केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून जोरदार समर्थन, लागू करण्याचा व्यक्त केला निर्धार
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
नागरीकत्व सुधारणा कायदा (सीएए) भारतासाठी किती आवश्यक आहे, हे बांगला देशमधील घटनांवरुन स्पष्ट होत आहे. बांगला देशमध्ये शेख हसीना यांची सत्ता उलथविण्याची प्रक्रिया घडत असताना धर्मांधांनी तेथील हिंदूंवव अनन्वित अत्याचार केले. या हिंदूंसाठी नागरिकत्व सुधारणा कायदा महत्वाचा ठरतो. शेजारी देशांमधील अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अत्याचारांकडे भारत स्वस्थपणे पहात राहू शकत नाही, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे.
ते गुजरातमधील अहमदाबाद येथे एका कार्यक्रमात भाषण करीत होते. त्यांनी गुजरामध्ये 1,003 कोटी रुपयांचे विकास योजनांचे अनावरण केले. आपल्या भाषणात त्यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याचे महत्व आजूबाजूच्या देशांमध्ये घडणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर विशद केले. हा कायदा केवळ शेजारी देशांमधील अल्पसंख्य समुदायांच्या सुरक्षेसाठी नाही, तर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आहे. त्यामुळेच काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष त्याच्या विरोधात आहेत. त्यांना हिंदू समाजाला न्याय मिळावा असे वाटत नाही, अशी बोचरी टीका त्यांनी केली.
फाळणीपासूनची प्रक्रिया
स्वातंत्र्य मिळत असताना भारताचे अखंडत्व भंगले. त्यानंतर पाकिस्तानातून भारतात निर्वासितांचा महापूर लोटला. या निर्वासीतांमध्ये हिंदू, शीख, जैन, बौद्ध अशा विविध अल्पसंख्याकांचा समावेश होता. पण भारतात आल्यानंतरही त्यांना काँग्रेसच्या बोटचेप्या आणि तुष्टीकरणाच्या धोरणामुळे न्याय मिळू शकला नाही. त्यानंतरही गेल्या 77 वर्षांमध्ये शेजारी देशांमध्ये, तेथील अल्पसंख्याकांवर, विशेषत: हिंदूंवर अन्याय आणि अत्याचार होतच राहिले. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा अपवाद वगळता अन्य कोणत्याही सरकारांनी, विशेषत: काँग्रेस आणि इतर धर्मनिरपेक्ष सरकारांनी या हिंदूंचा सहानुभूतीपूर्वक विचार केला नाही, त्यामुळे त्यांची स्थिती अधिकच दयनीय झाली, असा आरोप त्यांनी केला.
लोकसंख्येत मोठी घट
बांगला देश आणि पाकिस्तानातील हिंदूंच्या लोकसंख्येत मोठी घट झाली आहे. बांगला देशात हिंदूंची लोकसंख्या 1947 मध्ये 27 टक्के होती. आता ती केवळ 9 टक्के राहिली आहे. हे सगळे हिंदू गेले कुठे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या हिंदूंचे सक्तीने धर्मांतर करण्यात आले की त्यांना ठार मारण्यात आले ? त्यांना हिंदू म्हणून सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार नाही काय ? पण याचा विचार भारतातले विरोधी पक्ष करत नाहीत, असा घणाघात शहा यांनी केला.
सीएए मुस्लीम विरोधी नाही
सीएए हा कायदा शेजारी देशांमधील अन्यायाला कंटाळून भारतात आलेल्या तेथील अल्पसंख्याकांसाठी आहे. त्याचा भारतातील मुस्लीमांना कोणताही त्रास होणार नाही. तथापि, भारतातील मुस्लीमांच्या मनात या कायद्यासंबंधी काही हितसंबंधी लोकांनी त्यांच्या व्यक्तीगत आणि राजकीय स्वार्थासाठी अपसमज निर्माण केले आहेत. त्यामुळे त्यांनी सावध रहावे, असा इशाराही त्यांनी दिला.
विविध योजनांचा शुभारंभ
अमित शहा यांनी अहमदाबादमध्ये गुजरातसाठीच्या विविध योजनांचा शुभारंभ केला. या विकासयोजनांवर 1,003 कोटी रुपये खर्च आलेला आहे. तसेच त्यांनी देशव्यापी वृक्षारोपण कार्यक्रमाचाही प्रारंभ केला. या कार्यक्रमात गुजरातसह भारतातील सर्व लोकांनी सहभागी व्हावे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी अधिकाधिक वृक्षांची लागवड करणे आवश्यक आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या संबंधात एक व्यापक योजना सज्ज केली असून ती टप्प्याटप्प्याने लागू केली जाणार आहे, अशी माहितीही अमित शहा यांनी या प्रसंगी दिली.
सीएएचे महत्व सिद्ध
ड बांगला देश आणि इतर शेजारी देशांमधील अल्पसंख्याकांसाठी सीएए
ड काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष अशा हिंदूंच्या संदर्भात असंवेदनशील
ड बांगला देश, पाकिस्तानातील हिंदूंच्या संख्येत सात दशकात मोठी घट
ड अशा पिडीत हिंदूंना संरक्षण देण्याचे भारताचे आहे नैतिक उत्तरदायित्व









