56 पैकी 16 विमाने रेडी टू-फ्लाय स्थितीत मिळणार : उर्वरित विमानांची भारतात निर्मिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एअरबस डिफेन्स अँड स्पेस या युरोपीय कंपनीने बुधवारी भारताला पहिले सी-295 टॅक्टिकल मिलिट्री एअरलिफ्ट विमान सोपविले आहे. या विमानासोबत ग्रुप कॅप्टन पी. एस. नेगी यांनी बहारीन येथून उड्डाण केले होते, जे भारतीय भूमीवर उतरले आहे. वायुदलाचे पहिले सी-295 परिवहन विमान वडोदरा येथे दाखल झाल्याची माहिती वायुदलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
भारतीय भूमीवर पोहोचलेल्या या अत्याधुनिक विमानाचा वायुदलाच्या ताफ्यातील समावेश संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या एका कार्यक्रमाद्वारे होणार आहे. हा कार्यक्रम 25 डिसेंबर रोजी दिल्लीनजीकच्या हिंडन वायुतळावर पार पडणार आहे. वायुदलात एकूण 56 विमाने सामील केली जाणार आहेत. यातील 40 विमानांची निर्मिती भारतात टाटा समूह आणि एअरबसकडून संयुक्तपणे केली जाणार आहे.
सी-295 हे विमान वायुदलातील ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट एवरो-748 ची जागा घेणार आहे. सी-295 प्रकारातील दुसरे विमान मे महिन्यापर्यंत भारतात दाखल होणार आहे. पहिले सी-295 परिवहन विमान आगरा वायुतळावर तैनात केले जाणार असल्याचे समजते. या वायुतळावरच वैमानिकांच्या प्रशिक्षणाचे केंद्रही निर्माण केले जात आहे.
सप्टेंबर 2021 मध्ये भारताने एअरबस डिफेन्स अँड स्पेस या कंपनीसोबत सी-295 विमानांसाठी 21 हजार कोटी रुपयांचा करार केला होता. हा करार 56 विमानांच्या खरेदीसाठी होता. यातील 16 विमाने ही रेडी टू-फ्लाय स्थितीत स्पेनमधून भारतात पेहोचणार आहेत. उर्वरित 40 विमानांची निर्मिती गुजरातच्या वडोदरा येथील टाटा अॅडव्हान्स सिस्टीम कंपनीकडून केली जाणार आहे.
पुढील वर्षापासून भारतात निर्मिती
टाटा अॅडव्हान्स सिस्टीम लिमिटेड वडोदरा येथे पुढील वर्षाच्या मध्यापासून सी-295 विमानाच्या निर्मितीला सुरुवात करणार आहे. सध्या याच्या फायनल असेंबलीचे काम सुरू आहे. पहिले स्वदेशी सी-295 विमान 2026 मध्ये निर्माण होणार आहे. फायनल असेम्बलिंगसाठी एअरबस आणि टाटाच्या हैदराबाद अन् नागपूर प्रकल्पात 14 हजारांहून अधिक स्वदेशी सुटे भाग तयार करून वडोदरा येथे पाठविले जाणार आहेत. कंपनी 2031 पर्यंत वायुदलाला सर्व 40 विमाने सोपविणार आहे.
नौदल अन् तटरक्षक दलही इच्छुक
वायुदलासोबत नौदल आणि तटरक्षक दल देखील 15-16 विमाने खरेदी करण्याचा विचार करत आहे. नौदलासाठी 10 विमाने किनारी देखरेख अन् गस्तकार्यासाठी खरेदी केली जाणार आहेत. तर तटरक्षक दल देखील 6 विमानांद्वारे देखरेख आणि ट्रूपर्स मूव्हमेंट करणार आहे. याचबरोबर बीएसएफने देखील सी-295 खरेदी करण्याची तयारी चालविली आहे. 6 वैमानिक आणि 10 इंजिनियर्सच्या पथकाने स्पेनच्या सेविलेमध्ये या विमानाच्या हाताळणीशी निगडित प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
काय आहे याची खासियत?
सी-295 हे विमान शॉर्ट टेक ऑफ आणि लँडिंग करू शकते. कंपनीनुसार हे विमान 320 मीटरच्या अंतरावरून टेकऑफ करू शकते. तर लँडिंगसाठी 670 मीटर लांब धावपट्टी आहे. म्हणजेच लडाख, काश्मीर, आसाम आणि सिक्कीम यासारख्या पर्वतीय क्षेत्रांमध्ये मोहिमांसाठी हे विमान अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. हे विमान स्वत:सोबत 7,050 किलोग्रॅमचे पेलोड वाहून नेऊ शकते. एकाचवेळी 71 सैनिक, 44 पॅराट्रुपर्स, 24 स्ट्रेचर किंवा 5 कार्गो पॅलेट नेऊ शकते. हे विमान सलग 11 तासांपर्यंत उड्डाण करू शकते आणि याच्या मागे रॅम्प डोअर असल्याने तो सैनिक अणि सामग्रीच्या जलद लोडिंग आणि ड्रॉपिंगसाठी निर्माण करण्यात आला आहे.









