संरक्षणमंत्र्यांनी स्वस्तिक काढून हवाई दलाकडे केले सुपूर्द
वृत्तसंस्था/ गाझियाबाद
फ्रान्सकडून भारताला मिळालेले पहिले सी-295 वाहतूक विमान सोमवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी औपचारिक विधी पार पाडल्यानंतर हवाई दलाच्या ताफ्यात समाविष्ट केले. या विमानामुळे सुरक्षा दलाच्या रसद आणि इतर क्षमतेला चालना मिळेल. एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांच्या उपस्थितीत हिंडन हवाई दल तळावर हा भव्य कार्यक्रम झाला. अशी आणखी 15 विमाने फ्रान्समधून ‘फ्लाइंग मोड’मध्ये येणार असून 40 लष्करी वाहतूक विमाने टाटा कंपनी भारतातच तयार करणार आहे.
हवाई दलाच्या हिंडन हवाई तळावर सोमवारी सकाळी भारत ड्रोन शक्ती-2023 कार्यक्रमात विविध क्षमतेच्या ड्रोनचे प्रदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय मंत्री जनरल विजय कुमार सिंग (निवृत्त), हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी उपस्थित होते. येथे 50 किलो ते 100 किलो वजन वाहून नेण्याची क्षमता असलेल्या ड्रोनचे अप्रतिम प्रात्यक्षिक करण्यात आले. याशिवाय शेतकऱ्यांच्या शेतीसाठी, वैद्यकीय मदत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी, युद्धादरम्यान बॉम्बस्फोट घडवण्यासाठी आणि सीमेवरील सैनिकांच्या पुढील चौक्मयांपर्यंत अन्न आणि रसद सामग्री पोहोचवण्यासाठी ड्रोनचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. याचदरम्यान सी-295 वाहतूक विमान भारतीय हवाई दलाच्या ताब्यात देण्यात आले.
सी-295 हे केवळ भारतानेच खास डिझाईन केलेले विमान असून ते देशभरात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण करण्यासाठी सज्ज आहे. गुजरातमधील आयएएफ प्रकल्पामुळे थेट 600 उच्च कुशल रोजगार, 3,000 पेक्षा जास्त अप्रत्यक्ष रोजगार आणि 3000 अतिरिक्त मध्यम-कुशल रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
…एका नव्या युगाची सुरुवात : भदौरिया
सी-295 विमान भारतीय हवाई दलाचा भाग बनले आहे. माजी हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल (निवृत्त) आरकेएस भदौरिया यांनी भारतीय हवाई दलात सी-295 च्या समावेशाचे वर्णन नवीन युग म्हणून केले आहे. सी-295 विमान भारतीय हवाई दलाचा भाग बनणे ही एका नव्या युगाची सुरुवात आहे. आगामी काळात हे विमान हवाई दलाचा कणा बनणार असल्याचे त्यांनी सांगितले. हे विमान अत्याधुनिक आणि सक्षम आहे. भारतीय हवाई दलासाठी आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सी-295 विमानाची ताकद…
विमान ताशी 480 किलोमीटर वेगाने 11 तास उ•ाण करू शकते
अपघातग्रस्तांना आणि आजारी लोकांच्या बचावासाठी वापर शक्य
सैन्य आणि उपकरणांच्या जलद वाहतुकीसाठी स्वतंत्र सोय उपलब्ध
आपत्तीच्या परिस्थितीत आणि किनारी भागात गस्त घालण्यास सक्षम
सैनिकांसह पॅराशूटच्या साहाय्याने साहित्य उतरवण्याचीही सुविधा









