शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने काहीवेळ शेतकरी-पोलिसांमध्ये झटापट : शेतकऱ्यांतून संताप
बेळगाव : बंद पाडण्यात आलेले हलगा-मच्छे बायपासचे काम सोमवार दि. 6 रोजी पुन्हा पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात आले. शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने बायपासवर काहीवेळ शेतकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. यावेळी शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सुटका केली. शेतकऱ्यांचा विरोध झुगारत पोलीस बंदोबस्तात ठेकेदाराने काम सुरू केल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे. हलगा-मच्छे बायपासचा खटला न्यायालयात सुरू आहे. त्यामुळे मूळ दाव्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत रस्त्याचे काम करू नये, अशी मागणी सातत्याने शेतकऱ्यातून केली जात आहे.
पण शेतकऱ्यांचा विरोध पायदळी तुडवत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदारांकडून काम सुरूच ठेवले जात आहे. झिरो पॉईंट निश्चित होत नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत रस्ता करण्यात येऊ नये, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. तरीही रस्ताकाम केले जात आहे. अनेकवेळा रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी बंद पाडून ठेकेदारांना जाब विचारला पण शेतकऱ्यांचा विरोध न जुमानता काम केले जात आहे. अधिवेशन काळात 15 डिसेंबरपासून बायपासचे काम बंद ठेवण्यात आले होते, तेव्हापासून तब्बल 20 दिवस काम बंद होते. पण शनिवारपासून ठेकेदारांनी कामाला सुरुवात केली.
ही माहिती समजताच रविवारी शेतकऱ्यांनी बायपासचे काम बंद पाडले. ठेकेदारांनीही काम बंद ठेऊन येथील साहित्य हलविले होते. भू-संपादन आणि वर्कऑर्डर दाखविल्याशिवाय काम सुरू करू नये, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. पण सोमवारी सकाळी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी बायपासच्या कामाला बंदोबस्त दिल्याने ठेकेदाराने पुन्हा कामाला सुरुवात केली. शेतकऱ्यांनी या कामाला विरोध करण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखून धरले. त्यामुळे पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये झटापट झाली. यावेळी काही शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.









