मातीचा भराव टाकून येळ्ळूर रोडपासून कामाला प्रारंभ : शेतकऱ्यांचा विरोध कायम
प्रतिनिधी/ बेळगाव
गेल्या वीस दिवसांपासून बंद ठेवण्यात आलेले हलगा-मच्छे बायपासचे काम शनिवार दि. 4 पासून पुन्हा सुरू करण्यात आले आहे. बायपासचा खटला न्यायप्रविष्ट असून शेतकऱ्यांचा विरोधही कायम आहे. पण याकडे दुर्लक्ष करत ठेकेदाराने काम सुरू केल्याने शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत तातडीने बैठक घेऊन लढ्याची पुढील रणनीती ठरविण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.
हलगा-मच्छे बायपासच्या कामाला सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांतून तीव्र विरोध केला जात आहे. मात्र, शेतकऱ्यांचा विरोध डावलून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून रस्त्याचे काम केले जात आहे. त्यामुळे शेतकरी याविरोधात न्यायालयात गेले आहेत. झिरो पॉईंट निश्चित होत नाही तोपर्यंत बायपासचे काम करण्यात येऊ नये, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. फिश मार्केट येथील झिरो
पॉईंट हलगा येथे हलविण्यात आला असल्याने त्याला शेतकऱ्यांचा आक्षेप आहे. अलीकडेच न्यायालयाने झिरो पॉईंट निश्चित करण्याचा अधिकार न्यायालयालाच असल्याचे स्पष्ट केल्याने शेतकऱ्यांनी वरिष्ठ दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. न्यायालयात खटला प्रलंबित असतानाही ठेकेदाराकडून बायपासचे काम केले जात होते. कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशन काळात बायपासचे काम सुरू होते. त्यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी 15 डिसेंबर रोजी बायपासचे काम बंद पाडले होते. ठेकेदाराने काम बंद ठेवून मशीनरी बाजूला केल्या होत्या. अधिवेशनाच्या बंदोबस्तात पोलीस यंत्रणाही व्यस्त होती. त्यामुळे बायपासच्या ठिकाणचा बंदोबस्त पोलिसांनी काढून घेतला होता. तब्बल वीस दिवस बंद असलेले बायपासचे काम अचानक शनिवारपासून ठेकेदाराने पुन्हा सुरू केले आहे. येळ्ळूर रोडपासून कामाला सुरुवात करण्यात आली असून नियोजित बायपासवर मातीचा भराव टाकला जात आहे.
रस्ताकामाला पुन्हा शेतकऱ्यांतून विरोध होऊ शकतो, या शक्यतेने बेळगाव ग्रामीण पोलिसांनी बायपासच्या ठिकाणी बंदोबस्त ठेवला आहे. बायपासचे काम पुन्हा एकदा सुरू करण्यात आले असले तरी या कामाला शेतकऱ्यांकडून विरोध केला जाणार आहे. लवकरच शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली जाणार असून त्यानंतर पुढील लढ्याची दिशा ठरविली जाणार आहे.









