रस्त्यावरून मशिनरी हटविल्या : केवळ कर्मचारी कामाच्या ठिकाणी बसून
बेळगाव : हलगा-मच्छे बायपासला विरोध करत शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने ठेकेदाराने तीन दिवसांपासून काम बंद ठेवले आहे. मंगळवार दि. 17 रोजी दुसऱ्या दिवशी सर्व मशिनरी आणि मातीचा भराव टाकण्यासाठी वापरले जाणारे टिप्पर बायपासवरून हटवून येळ्ळूर रोडनजीक उभे करण्यात आले होते. कामाच्या ठिकाणी सध्या केवळ कर्मचारीच बसून आहेत. बायपासचा खटला न्यायालयात सुरू असल्याने दावा दाखल केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीतून रस्त्याचे काम करण्यात येऊ नये, त्याचबरोबर झिरो पॉईंट, भूसंपादन आणि नोटिफिकेशनची कागदपत्रे दाखवण्यात यावीत, अशी मागणी करत शेतकऱ्यांनी रविवारी बायपासचे काम बंद पाडले होते.
ठेकेदाराला धारेवर धरत सर्व मशिनरी काढण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्याने ठेकेदाराने शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकत काम बंद केले. त्यातच सोमवार दि. 16 रोजी शेतकऱ्यांनी झिरो पॉईंट निश्चित करण्यासह बायपासविरोधात वरिष्ठ दिवाणी न्यायालयात दावा दाखल केल्याने न्यायालयात शेतकऱ्यांची बाजू पुन्हा भक्कम झाली आहे. सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने बायपासवरील पोलीस बंदोबस्त काढून घेण्यात आला आहे. त्यातच शेतकरी आक्रमक बनले असल्याने ठेकेदाराने गेल्या दोन दिवसांपासून काम बंद ठेवले आहे. मंगळवारी सर्व मशिनरी आणि टिप्पर येळ्ळूर रोडनजीक उभे करण्यात आले होते. शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्याने बायपासचे भवितव्य आता न्यायालयावर अवलंबून असणार आहे.









