हलगा-मच्छे बायपासवर पाणी तुंबल्याने तुर्तास काम बंद : शेतकऱ्यांतून समाधान
बेळगाव : गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने हलगा-मच्छे बायपासवर पाणी तुंबले आहे. त्यामुळे बायपासचे काम तुर्तास बंद ठेवण्यात आले आहे. शेतकऱ्यांचा तीव्र विरोध पायदळी तुडवत रस्ताकाम केले जात आहे. विरोध डावलून सुरू ठेवलेले बायपासचे काम निसर्गालादेखील मान्य नाही. त्यामुळे पावसाने काम थांबल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे. हलगा-मच्छे बायपासचे काम करण्यात येऊ नये, यासाठी गेल्या 15 वर्षांपासून शेतकऱ्यांतून तीव्र विरोध केला जात आहे. रस्ताकामात सुपीक जमीन जात असल्याने सुरुवातीपासून शेतकरी वेगवेगळ्या माध्यमांतून विरोध करत आहेत. रस्त्यावरच्या लढाईसह न्यायालयीन लढाईदेखील सुरू आहे.
मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासनाकडून शेतकऱ्यांचा विरोध पायदळी तुडवत रस्त्याचे काम केले जात आहे. अल्पभूधारक शेतकरी भूमीहीन होत आहेत. बहुतांश शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह शेतीवरच चालतो. बायपास करण्याऐवजी फ्लायओव्हर बांधण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. मात्र मनमानी पद्धतीने बायपासचे काम रेटले जात आहे. अनेकवेळा शेतकऱ्यांनी बायपासचे काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. पण पोलीसबळाचा वापर करत शेतकऱ्यांचा विरोध धुडकावण्यात आला. सध्या बायपास रोडवर मातीचा भराव टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे बायपास रोडवर पावसाचे पाणी तुंबल्याने चिखल निर्माण झाला आहे. परिणामी वाहने रुतत असल्याने बायपासचे काम बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे निसर्गालाही बायपास नको असल्याचे मत शेतकऱ्यांतून व्यक्त केले जात आहे.









