शेतकऱ्यांनी वर्क ऑर्डरची मागणी करताच ठेकेदाराची नरमाई : वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल
बेळगाव : वर्क ऑर्डर दाखविण्यासह किती शेतकऱ्यांना भरपाई मिळाली आहे? हे दाखविण्यात यावे, या मागणीसाठी शेतकरी सोमवार दि. 13 रोजी पुन्हा बायपासच्या कामाच्या ठिकाणी गेले होते. त्यामुळे शेतकरी आणि ठेकेदारामध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर भूसंपादन प्रांताधिकारी बलराम चव्हाण काहीवेळानंतर यरमाळ रोडवरील बायपासवर दाखल झाले. शेतकऱ्यांना त्यांनी सर्व प्रक्रिया समजावून सांगितली. त्यामुळे दुपारनंतर पुन्हा बायपासच्या कामाला सुरुवात झाली. गेल्या पंधरा वर्षांपासून हलगा-मच्छे बायपासचा वाद सुरू आहे. शेतकऱ्यांचा विरोध असतानाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जिल्हा प्रशासन आणि ठेकेदाराकडून बायपासचे काम केले जात आहे. बायपास रोडसाठी पिकाऊ जमीन घेतली जात असल्याने त्याला शेतकऱ्यांतून विरोध आहे. पण शेतकऱ्यांचा विरोध पायदळी तुडवत काम केले जात आहे.
शेतकऱ्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्यासह जिल्हा प्रशासनाकडेही पाठपुरावा चालविला आहे. झिरो पॉईंट निश्चित होत नाही तोपर्यंत बायपासचे काम करू नये, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. त्यासाठी न्यायालयात दावाही दाखल करण्यात आला आहे. या खटल्याची सुनावणी या आठवड्यात होणार असून तोपर्यंत काम बंद ठेवण्यात यावे, अशी मागणी करत शेतकऱ्यांनी रविवारी बायपासचे काम बंद पाडले होते. त्यानंतर सोमवारीही शेतकऱ्यांनी बायपासच्या ठिकाणी धाव घेतली. शेतकऱ्यांनी काम बंद करण्यास सांगितल्यानंतर ठेकेदाराने काम बंद ठेवले होते. कोणत्या आधारावर विरोध डावलत काम केले जात आहे, त्याबाबत कागदपत्रे सादर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. पण कागदपत्रे शेतकऱ्यांना देण्यात आली नाहीत. त्याठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी मध्यस्थी करत ही माहिती आपल्या वरिष्ठांना दिली.
त्यानंतर बेळगाव ग्रामीणच्या पोलीस उपनिरीक्षक यरमाळ रोडवर दाखल झाल्या. त्यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. सातत्याने कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी शेतकऱ्यांना दिला. त्यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी आता आपली सहनशक्ती संपली असून आम्हाला आत्मदहन करण्याची परवानगी द्या, अशी मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी भूसंपादन विभागाचे प्रांताधिकारी बलराम चव्हाण आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वकिलांशी संपर्क साधून बायपासच्या ठिकाणी येण्याची विनंती केली. काहीवेळानंतर प्रांताधिकारी बलराम चव्हाण यरमाळ रोडवरील बायपासच्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेत बायपास रोडसंदर्भात सविस्तर माहिती शेतकऱ्यांना समजावून सांगितली. त्यामुळे दुपारनंतर बायपासच्या कामाला पुन्हा एकदा सुरुवात झाली.









