सहा महिन्यांनंतर वेदांतामध्ये परतणार : नितीन गोलानी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील सर्वात मोठी शिक्षण-तंत्रज्ञान कंपनी बायजूचे मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) अजय गोयल यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. सहा महिन्यांपूर्वी ते या कंपनीत रुजू झाले होते. आता ते पुन्हा त्यांच्या पूर्वीच्या वेदांता कंपनीत परतणार आहेत. 2021-22 या आर्थिक वर्षासाठी ऑडिट प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर गोयल यांनी राजीनामा दिला आहे.
नितीन गोलानी यांच्याकडे जबाबदारी
कंपनीने सादर केलेल्या निवेदनानुसार, शिक्षण क्षेत्रातील दिग्गज प्रदीप कनाकिया यांची वरिष्ठ सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचवेळी, कंपनीचे संचालक (वित्त) नितीन गोलानी यांना पदोन्नती देऊन कंपनीचे आर्थिक व्यवहार हाताळण्यासाठी कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी (सीएफओ) म्हणून अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.
कनाकिया यांना 35 वर्षांचा उद्योगातला अनुभव आहे, त्यांनी प्राइस वॉटरहाऊस आणि केपीएमजी येथे नेतृत्वाची पदे भूषवली आहेत, तर गोलानी यांनी यापूर्वी आकाश एज्युकेशनमध्ये मुख्य धोरणात्मक अधिकारी म्हणून सेवा बजावली आहे.
गोयल यांचा बायजूमधील पहिला राजीनामा नाही
अजय गोयल यांचा बायजूमधील पहिला राजीनामा नाही, अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आधीच कंपनी सोडली आहे. सीईओ मृणाल मोहित, चिफ बिझनेस ऑफिसर प्रत्युषा अग्रवाल, बायजूचे वर्ग 4-10 स्कूल सेगमेंटचे बिझनेस हेड मुकुट दीपक आणि बायजूच्या ट्यूशन सेंटरचे बिझनेस हेड हिमांशू बजाज यांसारखे वरिष्ठ अधिकारी नुकतेच बायजू सोडून गेले आहेत. याशिवाय कंपनीच्या आंतरराष्ट्रीय व्यवसायाचे वरिष्ठ उपाध्यक्ष असलेले चेरियन थॉमस यांनीही कंपनीचा राजीनामा दिला आहे.
महिंद्रा लॉजिस्टीक्सचा समभाग 6 टक्के घसरणीत
मुंबई: दुसऱ्या तिमाहीतील नफ्याचा निकाल निरुत्साही राहिल्याचा परिणाम महिंद्रा लॉजिस्टीक्सवर बुधवारी शेअरबाजारात पाहायला मिळाला. महिंद्रा लॉजिस्टीक्सचा समभाग बुधवारी बीएसईवर इंट्रा डे दरम्यान 6 टक्के इतका घसरत 347 रुपयांवर खाली आला होता. अशाप्रकारे समभागाने 52 आठवड्यानंतर नीचांकी स्तर बाजारात गाठला होता. सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीत कंपनीला 16 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे.









