काकोडा येथील प्रकल्प तयार, लवकरच उद्घाटन : कचरा मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
पणजी : बायंगिणी – जुने गोवे येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी सर्व तयारी झाली आहे. लवकरच त्याकरिता राष्ट्रीय पातळीवर निविदा काढल्या जाणार आहेत. काकोडा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प बांधून तयार असून लवकरच त्या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सचिवालयात घेण्यात आली. मंडळाचे उपाध्यक्ष आणि मंत्री बाबूश मोन्सेरात तसेच महामंडळाचे इतर संचालकही उपस्थित होते. तसेच विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे सचिवही बैठकीस उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी सर्व प्रकल्पांचा घेतला आढावा
बैठकीत आतापर्यंत मंडळाने हाती घेतलेल्या प्रकल्पासंदर्भात आढावा घेण्यात आला. साळगाव पठारावरील कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे काम व्यवस्थित चालू आहे. प्रकल्पाचे विस्तारीकरणही करण्यात आलेले आहे. काकोडा प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झालेले आहे लवकरच या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येईल. काकोडा येथे वैद्यकीय कचरा, घातक कचरा तसेच ई-कचरा प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठीची व्यवस्था या प्रकल्पात करण्यात आली आहे. सोनसडा येथील प्रकल्पाच्या बाबतीत सरकारने कायदेशीर व सनदशीर मार्ग शोधून काढल्याबद्दल सर्व संचालकांनी सरकारचे अभिनंदन केले.
बायंगिणी प्रकल्प ‘पीपीपी’वर उभारणार
राज्यातील विविध भागात कचरा गोळा करण्याची व छोट्या प्रमाणात वर्गीकरण करण्याची केंद्रे स्थापन करण्याचे ठरविले आहे. तसेच राज्यात सर्वत्र जनतेमध्ये कचऱ्याबाबत जनजागृती करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. बायंगिणी-जुने गोवे येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प आणि कचऱ्यावर प्रक्रिया करताना त्यातून उर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्याचे ठरविले आहे. त्यासाठीची सारी प्रक्रिया झालेली आहे. आता केवळ त्या प्रकल्पासाठी राष्ट्रीय पातळीवर निविदा जारी केल्या जातील. साळगावप्रमाणेच वा त्याच धर्तीवर बांधा, वापरा व परत करा या धर्तीवर हा प्रकल्प उभारला जाणार आहे.
काकोडा प्रकल्पासाठी कचऱ्याची आवश्यकता
काकोडा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आलेला आहे, मात्र त्यासाठी आवश्यक तेवढा कचरा गोळा केला जात नाही. काणकोण, सांगे, केपे आणि धारबांदोडा या तालुक्यातून आवश्यक तेवढा कचरा गोळा कऊन तो काकोडा प्रकल्पाला पाठविण्यासाठी त्या त्या भागातील पंचायती व पालिकांनी आवश्यक ते प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे विचार बैठकीत व्यक्त करण्यात आले.
कुंडई प्रकल्पात कचरा पाठविण्याचे आवाहन
कुंडई येथे असलेल्या वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्पामध्ये सेनेटरी पॅड्स व तत्सम कचरा गोळा कऊन तो पाठविण्याची गरज अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. घातक कचरा व्यवस्थापन हे कुंडईमध्ये करण्यात आलेले आहे. त्यासाठी स्थानिक पंचायतींनी सहकार्य करण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले.
कचरा गोळा करण्यासाठी वापरणार कापडी पिशव्या
गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाने कचरा गोळा करण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी मुरगाव पालिका क्षेत्रात ‘पोती’ योजना आखलेली आहे. लवकरच या योजनेचे उद्घाटन करण्यात येईल. गोव्याने कचरा प्रक्रिया प्रकल्प उभाऊन जी सुविधा निर्माण केली आहे, याचा आदर्श किनारी भागातील इतर राज्यांनी घ्यावा, असे आवाहन राष्ट्रीय हरित लवादाने केले आहे, त्याचा उल्लेखही बैठकीत करण्यात आला.









