अध्याय अकरावा
गणेशगीतेचा चांगला अभ्यास करून आणि गुरूच्या मुखाने अर्थ जाणून रोज गणेशाची पूजा केल्यावर एककाल, द्विकाल अथवा त्रिकाल पठण करेल तो ब्रह्मरूप होतो. तो ब्रह्मरूप झाल्याने त्याचे दर्शन घेणाराही ह्या भवसागरातून मुक्त होतो. सद्गुरूंकडून ग्रंथ समजावून घ्यायची संधी मिळणारा परम भाग्यवान म्हणायला हवा कारण बाप्पांच्या सांगण्यातला अचूक अर्थ सद्गुरुच बरोबर सांगू शकतात पण सर्वांना हे भाग्य लाभतंच असं नाही तेव्हा ग्रंथ हेच गुरु हे बोधवाक्य लक्षात ठेवून, ग्रंथांच्या अभ्यासातून का होईना गणेशगीता समजावून घ्यावी. अत्यंत श्रद्धेनं तिचं दिवसातून एकदा, दोनदा, तीनदा पठण करावं. बाप्पांच्यावर असलेली श्रद्धा ही सगळ्यात महत्त्वाची असल्याने, जो मनुष्य समजून उमजून गणेशगीता वाचतो त्याच्यावर त्यातील उपदेशाचा विलक्षण प्रभाव पडतो. त्या प्रभावाने, त्याची वागणूक अत्यंत सत्वयुक्त होऊन, त्याच्या परिणामाने त्याच्यातील विकार हळूहळू निष्प्रभ होत जातात. त्यामुळे त्याची वागणूक अंतर्बाह्य बदलून जाते. सदैव सतप्रवृत्तीने वागत असल्याने, वाचन करणाऱ्याच्या चेहऱ्यावर एकप्रकारचे मंगल तेज निर्माण होते. अशा प्रसन्न आणि मंगल व्यक्तीचे दर्शन जरी घडले तरी दर्शन घेणारा मुक्त होऊन जातो. इतका त्या तेजाचा प्रभाव असतो. पुढील श्लोकात यज्ञ, दान, व्रते करून जे साध्य होत नाही ते परब्रह्म गणेशगीतेच्या पठणाने प्राप्त होते असे सांगितले आहे.
न यज्ञैर्न व्रतैर्दानैर्नाग्निहोत्रैर्महाधनैऽ ।
न वेदैऽ सम्यगभ्यस्तैऽ सम्यज्ञातैऽ सहाङ्गकैऽ ।। 43।।
पुराणश्रवणैर्नैव न शास्त्रwऽ साधुचिन्तितैऽ ।
प्राप्यते ब्रह्म परममनया प्राप्यते नरैऽ ।। 44।।
अर्थ- यज्ञांनी, व्रतांनी, दानांनी, संपत्तीने युक्त अशा अग्निहोत्रांनी, उत्तम प्रकारे अभ्यास केलेल्या व अंगांसह उत्तम प्रकारे जाणलेल्या वेदांनी मनुष्यांना परम ब्रह्म प्राप्त होत नाही. मात्र या गीतेच्या पठणाने ते प्राप्त होते.
विवरण- यज्ञ, व्रत, दान ही निरनिराळी चित्तशुद्धी होण्याची साधने आहेत. तसेच वेदांचे समग्र अध्ययन करून पापनाशन होते. परंतु हे सर्व करत असताना साधकाच्या मनातील मी आणि माझं हा विचार कायम असतो. वरील साधने ही सकाम असतात. त्यातून फलप्राप्तीची अपेक्षा असते. चित्तशुद्धी व्हावी, पापनाशन व्हावं इत्यादी अपेक्षा ठेऊन वरील साधनांचा अवलंब केला जातो. त्यासाठी श्रम, वेळ, पैसा खर्च केला जातो. यज्ञ, याग, दान देऊन जे पुण्य मिळतं ते उद्धार होण्यासाठी पुरेसं नसतं कारण त्यामागे मी देणारा आहे, मी कर्ता आहे अशी भावना असते त्यामुळे गणेशगीता अत्यंत श्रद्धेनं पठण करणाऱ्याच्या नखाचीही सर ह्या साधनांना येत नाही.
योग, ध्यान, समाधी आदि साधने ईश्वरप्राप्तीसाठी निश्चितच श्रेष्ठ आहेत पण सर्वांना ती साधणे तसे अवघड असते. कारण सर्वसामान्य माणसाची त्यासाठी आवश्यक ती एकाग्रता लवकर होत नाही. सामान्य मनुष्याची ही अडचण लक्षात घेऊन बाप्पांनी सामान्य माणसाचाही उद्धार व्हावा या दृष्टीने भक्तिमार्गाची भलावण केली आहे. बाप्पांच्यावर अत्यंत श्रद्धा असलेला भक्त स्वत:ला विसरून बाप्पांची अनन्य भक्ती करत असतो. त्याला बाप्पांच्याकडून कधीही, काहीही नको असतं. बाप्पांच्याशिवाय जगात काही आहे हेच त्याला मान्य नसल्याने बाप्पा त्याचे अंकित होतात आणि इतरांना जे मिळणं केवळ अशक्य आहे असं परब्रह्म बाप्पा त्याच्या सहजी ओट्यात घालतात. मनुष्य सर्व काही देऊ शकेल पण स्वत:ला विसरू शकत नाही हे फक्त अनन्य भक्तालाच शक्य होतं. मग त्यानं काहीही न मागता बाप्पा त्यांच्याकडून जे सर्वोच्च देणं शक्य आहे ते त्याला देतात.
क्रमश:








